पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने अनेक पालकांचे स्थलांतर, पहिली, नववी, अकरावीचे निकाल मूल्यमापनावर देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:00 AM2021-04-03T04:00:07+5:302021-04-03T04:00:39+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनचे संकेत यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आपल्या मुलांसह मूळ गावी जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईलगतच्या काही पालकांनी तर स्थलांतराला सुरुवातही केली आहे.

Many parents relocate for fear of lockdown, demand for first, ninth, eleventh results on assessment | पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने अनेक पालकांचे स्थलांतर, पहिली, नववी, अकरावीचे निकाल मूल्यमापनावर देण्याची मागणी

पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने अनेक पालकांचे स्थलांतर, पहिली, नववी, अकरावीचे निकाल मूल्यमापनावर देण्याची मागणी

Next

 मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग, रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनचे संकेत यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आपल्या मुलांसह मूळ गावी जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. मुंबईलगतच्या काही पालकांनी तर स्थलांतराला सुरुवातही केली आहे. मात्र पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मूल्यमापनासंदर्भात, शैक्षणिक वर्षाच्या संदर्भात अद्याप काहीच निर्णय नसल्याने पालक संभ्रमात पडले आहेत. ज्या पालकांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे त्यांनी आता आमच्या पाल्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर थेट पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी शाळा व शिक्षण विभागाकडे केली आहे.शिक्षक व मुख्याध्यापकही शिक्षण विभागाने यासंदर्भात निर्णय घेऊन पालक विचारत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम द्यावा, अशी मागणी केली आहे. 

मागील वर्षी याचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून एव्हाना विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक सगळेच संभ्रमात आहेत. यामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वगळता इतर विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण व ऑनलाइन परीक्षांच्या आधारावर पुढील वर्गात प्रवेश देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र याबाबतीतील कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याउलट पालकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शाळांनी वार्षिक परीक्षेसाठी शिक्षकांना प्रश्नपत्रिका काढण्यास सांगितले आहे तर अनेकांनी वार्षिक परीक्षांचे नियोजन पालकांना पाठविले आहे; म्हणजेच या कोणामध्येही या परीक्षांच्या बाबतीत एकसूत्रता नाही. काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षणावर आधारित मूल्यमापन न्याय्य असेलच असे नाही, अशी पालकांची धारणा असल्याची माहिती राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली. मार्च २०२० पासून आतापर्यंत हे विद्यार्थी, शिक्षक सतत ऑनलाइन शिक्षणात असून आता तरी त्यांना त्यापासून सुट्टी मिळणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला 
आहे.    

या कालावधीत दरवर्षी मार्चपर्यंत पहिली ते नववीपर्यंतच्या इयत्ताचे पाठ्यक्रम पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात निकाल जाहीर होतात. यंदा अद्याप यासंदर्भात काही घोषणाच नसल्याने शाळांना अडचणी येत असल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. आता दहावी - बारावीच्या ऑफलाइन परीक्षांची तयारीही शाळांमध्ये सुरू असल्याने या इतर वर्गांच्या परीक्षा नियोजनाला कसा व केव्हा वेळ द्यायचा, असा प्रश्न शाळा प्रशासन विचारीत आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शैक्षणिक सत्राची समाप्ती करून  विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी; आणि इतर वर्गांचे नवीन शैक्षणिक वर्षही जुलै २०२१ पासून घोषित केले जावे, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. 

शिक्षणसंस्थांपासून सगळेच संभ्रमात 
मागील वर्षी याचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाकडून एव्हाना विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक सगळेच संभ्रमात आहेत. यामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वगळता इतर विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण व ऑनलाइन परीक्षांच्या आधारावर पुढील वर्गात प्रवेश देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. 

Web Title: Many parents relocate for fear of lockdown, demand for first, ninth, eleventh results on assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.