Manoj Jarange Latest news: "नियमांचं पालन करून आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी सुरूच राहणार. सरकारने आमच्याविरोधात न्यायालयात जाऊन अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो. सगळ्या मागण्यांची (हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर) अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली. त्यानंतर ते बोलत होते.
आझाद मैदाना मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, आज पाचवा दिवस आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याची भूमिका मांडली.
जरांगे म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय. रात्री न्यायालयाच्या एका विषयावर आम्ही सांगितलं की, रोडवरील सर्व गाड्या काढा आणि मैदानात लावा. चार-पाच तासांत एकही गाडी रस्त्यावर ठेवली नाही. न्यायदेवतेच्या एका शब्दावर आम्ही जिथे ट्रॅफिक नाही, अशा ठिकाणी लावल्या आहेत", असे जरांगे यांनी सांगितले.
"सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. त्याला काय अडचणी आहेत, त्या आम्हाला सांगा. मराठा-कुणबी एक आहेत, यात काय अडचणी आहेत; तेही आम्हाला सांगा. सरसकट राज्यातील केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करा", अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
"बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी द्यावी. आतापर्यंत ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या नोंदी चिटकवून जागेवरच कुणबी प्रमाणपत्र वाटप करणे आवश्यक आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, त्यांची वैधता तातडीने द्या. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही", असेही जरांगे म्हणाले.