Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद

LIVE

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 17:41 IST2025-08-29T07:49:09+5:302025-08-30T17:41:30+5:30

Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे.

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha Live Update Manoj Jarange arrives in Mumbai to demand Maratha reservation Attention to what decision the government will take | Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद

Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live :मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पण त्याला आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बोलताना १० टक्के आरक्षण दिलं असून, आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करुन मागणी करावी, असे म्हटले होते. परंतु मनोज जरांगे हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत सरकारची शिष्टाई यशस्वी होणार की नाही, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

LIVE

Get Latest Updates

30 Aug, 25 : 08:40 PM

मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोनलाना आणखी एक दिवस परवानगी मिळाली आहे.

30 Aug, 25 : 08:27 PM

जरांगे पाटील यांना तिसऱ्या दिवशीही आंदोलनास परवानगी

मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही परवानगी दिली. आता उद्यासाठी म्हणजेच तिसऱ्या दिवशीही मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.

30 Aug, 25 : 07:28 PM

मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

 आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विजय घोगरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील आहे.  या तरुणाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

30 Aug, 25 : 05:40 PM

अंबादास दानवे यांनी जरांगे पाटील यांची घेतली भेट

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदानात दाखल होत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत दानवे यांनी फोनवरून उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांचा संवाद घडवून दिला. जरांगे यांनीही उद्धव ठाकरेंशी आंदोलनाबाबत चर्चा केली. 

30 Aug, 25 : 03:23 PM

न्या. शिंदे आझाद मैदानात दाखल, जरांगेसोबत चर्चा सुरू

मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी न्या. शिंदे आणि विभागीय आयुक्त जातील.  तिथे झालेल्या चर्चेनंतर पुन्हा उपसमितीची बैठक होईल.  त्यावर तोडगा काढला जाईल असं सांगितले होते. सध्या मराठा आरक्षणावर न्या. शिंदे जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. 

30 Aug, 25 : 03:18 PM

मराठा आंदोलनामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे. नवी मुंबईतून मुंबईला जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

30 Aug, 25 : 03:05 PM

अमित शाह यांनीही जरांगेंना भेटायला जावे, राऊतांची मागणी

मुंबईतील मराठा आंदोलनाला आणखी एक दिवस परवानगी दिली म्हणून उपकार केले नाहीत. महाराष्ट्रातून हजारो लोक आले आहेत. आंदोलन कधीपर्यंत संपवायचे हे ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. जर आंदोलन लवकर संपवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह थेट जरांगे पाटील यांच्याशी बोलले पाहिजे. गृहमंत्री अमित शाह मजा करण्यासाठी मुंबईत येतात. आरक्षणाचा संपूर्ण मुद्दा गृह खात्यातंर्गत येतो. त्यांनीही जरांगे पाटील यांना भेटायला जावे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

30 Aug, 25 : 01:16 PM

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपली

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. या आंदोलनामुळे मुंबई थांबली नाही. न्यायाधीश शिंदे समितीचे अध्यक्ष मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जात आहेत. न्या.शिंदे, विभागीय आयुक्त जरांगेंशी चर्चा करतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे ही भूमिका आहे. चर्चेत जे मुद्दे उपस्थित होतील, त्यावर उपसमितीत चर्चा होईल. आंदोलनस्थळी वीज, पाण्याची सोय करण्यात आली आहेत. आंदोलकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महापालिका आयुक्तही या बैठकीला होते. महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. या प्रश्नात राजकारण करण्यापेक्षा समस्या कशी सुटेल याकडे पाहिले पाहिजे. मागे काय घडले त्यापेक्षा पुढे काय केले पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. मराठा मोर्चामुळे मुंबई थांबली असं म्हणणं योग्य नाही.  असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. 

30 Aug, 25 : 11:45 AM

CSMT परिसरात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा सज्ज

 

सीएसएमटी परिसर सकाळ पासून ठप्प झाला आहे. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा सज्ज झाला आहे. आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

30 Aug, 25 : 11:45 AM

अमित शाह मुंबईत, मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंशी तासभर चर्चा

मुंबईत सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. तशातच आज मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील मुंबईत आले. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ते मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी गणेशदर्शनाला जाण्याआधी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर तासभर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंद दाराआड चर्चा केली. काहींच्या म्हणण्यानुसार, शाह यांची शिंदेंशी मराठाच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली.

30 Aug, 25 : 11:41 AM

"बीएमसी आयुक्त कोण आहे, नाव लिहून ठेवा..."; जरांगेंचा इशारा

मराठा आंदोलकांना मुद्दाम त्रास दिला जातोय. पालिकेवर सध्या प्रशासकाचे राज्य आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरीही आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, असेही जरांगेंनी म्हटले आहे.

30 Aug, 25 : 11:23 AM

संयम ठेवा, सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका; जरांगेंचा मराठा आंदोलकांना आवाहन

आपल्याला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे. सर्व आंदोलकांना विनंती आहे की, तुमच्या गाड्या दिलेल्या पार्किंगमध्ये लावा. संयम बाळगा, शांत रहा, आपण वाट बघू. काहीही वाईट करायचे नाही, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना केले.

30 Aug, 25 : 10:22 AM

मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम

मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले असून, आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. काही मराठा आंदोलक सध्या आझाद मैदानातून बाहेर पडून, मुंबई महापालिकेच्या समोर येऊन रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत आहेत. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळते आहे. आंदोलकांनी पूर्ण रस्ता जाम केला आहे.

30 Aug, 25 : 09:35 AM

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

मनोज जरांगे पाटील यांना शुक्रवारच्या एका दिवसासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती. ती परवानगी आणखी एका दिवसासाठी म्हणजे आजच्या दिवसभरासाठी वाढवून देण्यात आली आहे. आंदोलकांच्या या मागण्या, मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्याने झालेली वाहतूक कोंडी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी सरकार काय पावले उचलते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

29 Aug, 25 : 09:24 PM

आझाद मैदानाच्या आजूबाजूची मैदाने मोकळी करा!

सरकारने आणि पोलिसांनी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पार्किंग झोन घोषित करावेत, जेणेकरुन बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना त्यांच्या गाड्या कुठे लावायच्या याची आधीच माहिती मिळेल. आझाद मैदानाच्या आजूबाजूची मैदाने पार्किंगसाठी मोकळी करा, मराठे शांततेत आंदोलन करतील हा सरकारला शब्द आहे असं मनोज जरांगे म्हणाले. 

29 Aug, 25 : 07:57 PM

मी तर संपणार नाहीतर, आरक्षण तरी घेणार!

ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरणार, पण मागे हटणार नाही असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले. आता फक्त आरक्षण घेणार नाही, तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
 

29 Aug, 25 : 07:35 PM

इंग्रजांपेक्षा हे सरकार बेक्कार; मनोज जरांगे-पाटलांचा सरकारवर आरोप

पत्रकार परिषदेत जरांगे-पाटलांनी म्हटले की, ‘मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. आता सरकारने शौचालये, खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत. आंदोलकांना पाणी आणि जेवण मिळू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहेत. इंग्रजांपेक्षा तुम्ही बेक्कार आहेत. गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका.'

29 Aug, 25 : 07:23 PM

मी मरेपर्यंत आंदोलन करत राहाणार : मनोज जरांगे-पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आणखी कठोर केली आहे. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे, अन्यथा आपण मरेपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, असा थेट इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारवर काही गंभीर आरोपही केले. आंदोलकांसाठी सरकारने कोणतीही सुविधा पुरवली नाही, असे ते म्हणाले. आंदोलनाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आल्याने आंदोलकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व परिस्थितीसाठी त्यांनी सरकारला जबाबदार धरले आहे.

29 Aug, 25 : 07:16 PM

मनोज जरांगे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

29 Aug, 25 : 07:06 PM

मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील

आज परवानगी दिली, उद्याचीही परवानगी दिली, त्यापेक्षा सरकारने गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं आणि गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकण्याची हीच संधी आहे. सगळे सरकारला विसरतील, पण आमचे मराठे सरकारला कायम लक्षात ठेवतील, असे मनोज जरांगे-पाटील त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.    

29 Aug, 25 : 06:29 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला मुदतवाढ

राठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. आज दिवसभर आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे, उद्याच्या परवानगीसाठी काही नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आल्याचे कळत आहे. आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी वाढवून मिळावी असा अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

29 Aug, 25 : 06:07 PM

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ

मनोज जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला आता एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. 

29 Aug, 25 : 05:57 PM

मनोज जरांगे-पाटील पत्रकार परिषद घेणार

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी ७ वाजता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेत ते आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.

29 Aug, 25 : 05:31 PM

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर फडणवीसांचे मोठे विधान

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ मागितली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, "या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल."

29 Aug, 25 : 05:25 PM

आझाद मैदानाबाहेर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईत वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. आझाद मैदान परिसरातील मंत्रालयाच्या दिशेने येणारा रस्ता मराठा आंदोलकांनी पूर्णपणे बंद केला आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत असल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आझाद मैदानापासून काही अंतरावरच मंत्रालयाची इमारत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते.

29 Aug, 25 : 05:11 PM

शासनाची भूमिका सहकार्याची : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणसाठी आंदोनल सुरू आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शासनाची भूमिका सहकार्याची आहे. एखादं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असेल तर त्याला सहकार्य करणे, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर वाहतूक कोंडी होत आहे. काही लोक आडमुठेपणामुळे वागतात आणि पूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं, त्याची खबरदारी घ्यावी."

 

29 Aug, 25 : 04:52 PM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक आज मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे आपल्या उपोषणाची सुरुवात केली, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत. याचवेळी CSTM बाहेर एका आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलकाने आपल्या अंगावर डिझेल ओतून घेतले होते. मात्र, वेळीच इतर आंदोलक आणि पोलिसांनी त्याला रोखले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला

29 Aug, 25 : 04:44 PM

मनोज जरांगेंना तातडीने अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याआधी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात दंड थोपडले आहेत. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रारही दाखल केली आहे.

29 Aug, 25 : 04:34 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद LIVE

29 Aug, 25 : 04:29 PM

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीहून मुंबईकडे तातडीने रवाना!

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तातडीने शिर्डीवरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता मोठा काही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईकडे रवाना होताना राधाकृष्ण विखे पाटलांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, ‘मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्याशी काही संपर्क होतो का यासाठी मी मुंबईला जात आहे. त्यांनी चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. सरकारही चर्चा करण्यासाठी तयार आहे. मुंबईत गेल्यानंतर याबाबत स्पष्ट निर्णय होईल.’

29 Aug, 25 : 03:49 PM

बैठकीला बोलावलं तेव्हा आले नाहीत, बाहेर बोलत होते - एकनाथ शिंदे

"आम्ही जे आरक्षण दिलं ते आज टीका करत आहे, त्यांनी ते टिकवलं नाही. या आंदोलनावर त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. जेव्हा मी बैठकीला बोलावलं तेव्हा बाहेर खूप काही बोलत होते. पण तिथे आले नाहीत. त्यांची भूमिका काय आहे? मराठा समाजावर सरकार कुठलाही अन्याय करणार नाही," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
 

29 Aug, 25 : 03:42 PM

Manoj Jarange Patil Morcha Live: मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलं- एकनाथ शिंदे

"पूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण हाय कोर्टामध्ये टिकलं देखील. पण काही लोक त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यात त्यांना अपयश आलं. आरक्षणासाठी त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे जे जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही समाजासाठी केलेले आहे आणि यापुढेही करु. पण समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही, ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची सुद्धा इच्छा नाही. कुणाचेही आरक्षण कमी न करता दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. मराठा समाजासाठी आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखे आहे ते देण्याची भूमिका सरकारची आजही आहे," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 

29 Aug, 25 : 03:27 PM

नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल - राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भूमिका मांडली. "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सरकारी दरबारी दिले आहे. ते प्राप्त झाले आहेत. त्यावर आता चर्चा सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानभूती आहे. सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी दाखला देण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे. त्यांच्या नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल, विचार होईल. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. सर्वांचीच भावना आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे," असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
 

29 Aug, 25 : 03:18 PM

नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल - राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भूमिका मांडली. "मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सरकारी दरबारी दिले आहे. ते प्राप्त झाले आहेत. त्यावर आता चर्चा सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारची सहानभूती आहे. सरकारने हा प्रश्न कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेतल्या आहेत. विशेषतः हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी दाखला देण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे. त्यांच्या नवीन मागण्या असतील तर त्यावर चर्चा होईल, विचार होईल. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. सर्वांचीच भावना आहे की आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे," असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
 

29 Aug, 25 : 02:07 PM

मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर काय गुवाहाटीला जाणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

"मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे. न्याय हक्कासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर काय गुजरात गुवाहाटीला जाणार? नाईलाजाने मराठी माणसाला न्याय हक्कासाठी मुंबईला यावं लागलं. सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मराठी माणसं दंगल करायला नाही तर न्याय हक्कासाठी आलेली आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

29 Aug, 25 : 01:33 PM

29 Aug, 25 : 12:51 PM

Manoj Jarange Patil Morcha Live: आंदोलकांकडून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न; CSMT परिसरात वाहनांची कोंडी

आझाद मैदावर मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून काही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. काही आंदोलकांकडून सीएसएमटी परिसरात वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

29 Aug, 25 : 12:40 PM

Manoj Jarange Patil Morcha Live: राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली. 

29 Aug, 25 : 10:42 AM

Manoj Jarange Patil Morcha Live: आंदोलनाची परवानगी वाढवून द्या; मनोज जरांगेची मागणी

"मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आज कोट्यावधी लोक मुंबईत आणली आहेत. आम्हाला माज मस्ती नाहीय आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सामना करा. हे मराठे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत. आमच्या आंदोलनाची परवानगी आत्ताच्या आत्ता वाढवून द्या. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. तुम्ही जर अडथळे आणले तर पुन्हा मराठा समाज मुंबईकडे निघेल. मी जागा सोडणार नाही. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

29 Aug, 25 : 10:31 AM

Manoj Jarange Patil Morcha Live: लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं

"सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घरोघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
 

29 Aug, 25 : 10:06 AM

Manoj Jarange Patil Morcha Live: मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. १० वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत.

29 Aug, 25 : 09:54 AM

राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल

29 Aug, 25 : 09:46 AM

आंदोलन सुरु असताना खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे हेतू काय? रोहित पवारांचा सवाल 

"आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा," असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं.

29 Aug, 25 : 08:48 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी

Manoj Jarange Patil Morcha Live : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी बुधवारी अखेर सशर्त परवानगी दिली. मात्र, ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना मैदानात थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश पोलिसांनी दिले. जागेची क्षमता लक्षात घेता ५ हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत प्रवेश असेल, तर इतर वाहनांना वाडीबंदर जंक्शनपर्यंत मर्यादित ठेवले आहे.
 

29 Aug, 25 : 08:39 AM

Manoj Jarange Patil Morcha Live: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या?

मराठा समाजाला इतर मागासवर्गमधून आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मराठा कुणबी एकच असल्याचे पुरावे असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडतात, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही (नातेवाईकांना) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. यासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे, १३ महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे असे जरांगेंचे म्हणणे आहे.

मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे, अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, वंशावळ जोडण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करावी

दर १० वर्षांनी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातींचे सर्वेक्षण करून त्यांना आरक्षणातून वगळावे

29 Aug, 25 : 08:23 AM

Manoj Jarange Patil Morcha Live: मराठा आंदोलकांचा मुंबई लोकलने प्रवास

29 Aug, 25 : 08:22 AM

Manoj Jarange Patil Morcha Live : आंदोलनामुळे मुंबईतील हे रस्ते बंद राहणार

वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे

वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉम्बेकडे

छेडानगरवरून फ्रीवेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे

व्ही. एन. पुरव मार्गावरून साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे

देवनार फार्म रोड मार्गाकडून पांजरपोळकडे

ट्रॉम्बे चिता कॅम्पकडून व्ही. एन. पुरव मार्गावरून फ्री-वेला व पांजरपोळकडे जाणारा

सायन पनवेल मार्गावरून पांजरपोळकडे येणारा

सी. जी. गिडवाणी उत्तर वाहिनीवरून पांजरपोळकडे येणारा

फ्री-वे उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ जंक्शन येथे खाली उतरणारा

आय. ओ. सी. जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजकडून फ्री-वेवर दक्षिण वाहिनीवर जाणारा

वामन तुकाराम पाटील मार्गावरून पांजरपोळ जंक्शन येथून फ्री-वे उत्तर वाहिनी मार्गिका.

29 Aug, 25 : 08:07 AM

Manoj Jarange Patil Morcha Live : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा रुट

मराठा समाजाचा मोर्चा नवी मुंबई मार्गे सायन-पनवेल मार्गाने पांजरपोळ (चेंबूर) येथून कार आणि इतर वाहने आझाद मैदान येथे जाणार आहेत. मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वेने अन्य वाहने वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील. यापुढे मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदान येथे जातील. इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्किंगसाठी नेण्यात यावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाडीबंदर येथून आंदोलक त्यांना सोयीस्कर ठरेल त्या पद्धतीने आझाद मैदान येथे पोहोचतील.मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा रुट
 

29 Aug, 25 : 08:02 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी

Manoj Jarange Patil Morcha Live : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी बुधवारी अखेर सशर्त परवानगी दिली. मात्र, ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना मैदानात थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश पोलिसांनी दिले. जागेची क्षमता लक्षात घेता ५ हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत प्रवेश असेल, तर इतर वाहनांना वाडीबंदर जंक्शनपर्यंत मर्यादित ठेवले आहे.
 

29 Aug, 25 : 07:57 AM

वाशी टोलनाका ते वाशी प्लाझा पर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग, घोषणा देत टोल नाका ओलांडला

Web Title: Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha Live Update Manoj Jarange arrives in Mumbai to demand Maratha reservation Attention to what decision the government will take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.