Mumbai: हॉटेलमध्ये रूम बुक करुन लावला 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड; पत्नीला मेसेज करत टॉयलेटमध्ये संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:51 IST2025-03-07T14:45:55+5:302025-03-07T14:51:15+5:30
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली.

Mumbai: हॉटेलमध्ये रूम बुक करुन लावला 'डू नॉट डिस्टर्ब'चा बोर्ड; पत्नीला मेसेज करत टॉयलेटमध्ये संपवलं आयुष्य
Mumbai Crime: बंगळुरुतील इंजिनिअर अतुल सुभाषसारखेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. मुंबईच्या विलेपार्ले भागात एका ४१ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी पत्नी आणि तिच्या मावशीला जबाबदार धरले. मृत व्यक्तीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीने एका हॉटेलच्या खोलीत हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
ॲनिमेशन इंडस्ट्रीशी संबंधित ४१ वर्षीय निशांत त्रिपाठी (Nishant Tripathi) नावाच्या व्यक्तीने विलेपार्ले येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी निशांत त्रिपाठीने त्या कंपनीच्या वेबसाइटवर सुसाईड नोट अपलोड केली होती. तसेच पत्नीसाठीही त्याने शेवटचा मेसेज केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतने तीन दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये चेक इन केले होते. हे भयंकर पाऊल उचलण्यापूर्वी निशांतने रुममध्ये 'डू नॉट डिस्टर्ब' असा बोर्ड लावला होता.
रूममधून कोणताच प्रतिसाद न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने खोली उघडली तेव्हा निशांत लटकलेला दिसला. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. निशांतने ही सुसाईड नोट त्याच्या कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे मात्र त्याला पासवर्ड लावल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला हक्क कार्यकर्त्या असलेल्या निशांतच्या आईने मुलाच्या मृत्यूसाठी अपूर्वा पारीख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांना जबाबदार धरलं आहे. निशांत त्रिपाठीच्या आईने मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नीलम चतुर्वेदी यांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
"हे अपूर्वासाठी आहे - हॅलो बेब.. तू हे वाचेपर्यंत मी निघून गेलेलो असेन. माझ्या शेवटच्या क्षणी मी तुझा तिरस्कार करू शकलो असतो पण या क्षणासाठी मी प्रेम निवडले. तेव्हा मी तुझ्यावर प्रेम केले, आताही तुझ्यावर प्रेम करतो. आणि मी वचन दिल्याप्रमाणे हे प्रेम कधीही कमी होणार नाही. माझ्या आईला माहीत आहे की मी ज्या संघर्षाला सामोरे गेलो आहे, त्यामध्ये तू आणि प्रार्थना आंटी माझ्या मृत्यूचे कारणही आहेस. म्हणूनच मी तुला विनंती करतो, माझ्या आईकडे जाऊ नकोस. ती आतून तुटली आहे, तिला एकटेच राहू द्या," असं निशांतने त्याच्या पत्नीसाठी लिहीलेल्या मेसेजमध्ये म्हटलं.
पीडित निशांतचे कुटुंबि कानपूरचे रहिवासी आहेत. निशांत ॲनिमेशन इंडस्ट्रीशी संबंधित होता. तो नवी मुंबईत राहत होता. मात्र पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी तो हॉटेलमध्ये शिफ्ट झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी निशांतने त्याच्या खोलीच्या दारावर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावला आणि बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
निशांतच्या मृत्यूनंतर आईची भावनिक पोस्ट
"आज मला जिवंत असून मेल्यासारखे वाटत आहे. तुम्ही मला जिवंत व्यक्ती म्हणून पाहत आहात, पण मी आतून मृत आहे. माझा मुलगा निशांत मला सोडून गेला. मी आता जिवंत मृतदेह बनले आहे. तो माझे अंतिम संस्कार करणार होता पण मी आज २ मार्च रोजी मुंबई येथे माझ्या मुलाचे अंतिम संस्कार केले. माझी मुलगी प्राची हिने तिच्या मोठ्या भावाचे अंतिम संस्कार केले. मला आणि माझ्या मुली प्राचीला धैर्य द्या जेणेकरून आम्ही एवढं मोठं संकट सहन करू शकू," असं निशांतच्या आईने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.