निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:53 IST2026-01-11T11:31:32+5:302026-01-11T11:53:56+5:30
Dagdu Sakpal: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज ...

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
Dagdu Sakpal: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दक्षिण मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख दगडू सकपाळ यांनी अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पडलेले हे खिंडार ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय मानले जात आहे.
दगडू सकपाळ हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. लालबाग-परळ या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांची मोठी पकड आहे. मात्र, आगामी निवडणुकीत आपल्या मुलीला पक्षाकडून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आणि तिकीट नाकारल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यांच्या या नाराजीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती, ज्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश झाला.
'शिवसेनेसाठी हा आनंदाचा क्षण' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सकपाळ यांच्या प्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मुंबईत, विशेषतः दक्षिण मुंबईत शिवसेना वाढवण्यात आणि रुजवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या येण्याने शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. आज आम्हाला लालबागच्या राजाचा आणि मुंबईच्या राजाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळाला आहे."
'छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला' - सकपाळ भावूक
पक्षप्रवेशानंतर दगडू सकपाळ काहीसे भावूक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, "ज्या पक्षासाठी आयुष्य वेचले, तो पक्ष सोडताना नक्कीच वेदना होत आहेत. मी हा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला आहे,"
राजकीय परिणाम आणि पार्श्वभूमी
दगडू सकपाळ हे गिरणगाव आणि लालबाग भागातील महत्त्वाचा चेहरा आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाच्या मतांच्या गणितावर मोठा परिणाम होऊ शकतो. चार दिवसावर आलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे गट सातत्याने ठाकरे गटातील जुन्या आणि जनसंपर्क असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहे. सकपाळ यांच्यासोबत त्यांचे शेकडो कार्यकर्तेही शिंदे गटात सामील झाल्याने विभाग स्तरावर शिवसेनेची (शिंदे गट) संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली आहे.