Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 06:01 IST2025-11-16T05:59:09+5:302025-11-16T06:01:22+5:30
काँग्रेसने मित्रपक्ष उद्धवसेनेशी फारकत घेत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.

Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: काँग्रेसने मित्रपक्ष उद्धवसेनेशी फारकत घेत मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका आघाडी म्हणून एकत्र लढलो. पण, त्यामधून काँग्रेसला काय मिळाले? आघाडीत असताना काय सहन केले ते आम्हाला माहित आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढेल, अशी घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली.
मुंबई काँग्रेसने ‘लक्ष्य २०२६’ अंतर्गत मालाड येथे आयोजित शिबिरात चेन्नीथला म्हणाले की, मुंबईतील २२७ जागांवर काँग्रेस उमेदवार पंजा चिन्हावर लढणार आणि काँग्रेस विजयी होईल. त्यासाठी आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी परवानगी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असे चित्र दिसत आहे. तर, मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास काँग्रेसने विरोध केल्याने पालिका निवडणुकीत मनसे व महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते.
चेन्नीथला म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस उमेदवार पंजा चिन्हावर लढणार आणि काँग्रेस विजयी होणार. ही निवडणूक एक आव्हान असले तरी त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.
रडणे बंद आणि लढणे सुरू करा
"काँग्रेसची विचारधारा वेगळी असल्याने निवडणुकीत पैसे फेकावे लागत नाहीत. जातीवाद करावा लागत नाही. निवडणुकीत हार-जीत होतच असते. पण, सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. पालिकेत सत्ता हवी असल्याने निवडणुकीत उभे राहणार आहोत. परभवातूनही धडा मिळत असतो. त्यामुळे नकारात्मकता सोडून द्या. रडायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगून नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागा."- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
मारहाणीची भाषा आमच्या संस्कृतीत नाही
"गेली तीन वर्षे पालिकेत नगरसेवक नसल्याने सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. मुंबईकरांच्या जमिनी बिल्डर, उद्योगपतींना विकल्या जात आहेत. महापालिकेत ३० वर्ष काँग्रेस सत्ता नाही. त्यामुळे या निवडणुकीत मुंबई काँग्रेस मुंबईकरांचा आवाज बनून निवडणुकीत उतरणार आहे. काही पक्ष सातत्याने मारहाणीची भाषा करतात. असंसदीय भाषा वापरली जाते. त्या पक्षाच्या काही गोष्टी आमच्या संस्कृतीला धरून नाहीत."- खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस
"बिहारमध्ये पक्षाचा झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. तो पाहूनही स्वबळावर निवडणूक त्यांना लढवायची असेल तर लढावी. कोणी त्यांना थांबवू शकत नाही. स्वबळाचा निर्णय त्यांना योग्य वाटत असला तरी तो योग्य की अयोग्य ते पुढील काही दिवसांत कळेल."- किशोरी पेडणेकर, उपनेत्या प्रवक्त्या, उद्धवसेना
"काँग्रेस नेतृत्वाने केलेली ही घोषणा हास्यास्पद आहे. स्वबळावर लढण्यासाठी मुंबईत बळ तर हवे. त्यांच्याकडे बळ नाही हा रणांगणातून पळ आहे. काँग्रेसची भूमिका नेहमीच बोटचेपेपणाची आहे. मराठी भाषिकांबाबत तीच भूमिका आहे. अन्य हिंदुस्थानी भाषिकांबाबतही सोबत न राहण्याचीही आहे. या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्र आणि मराठी माणूस जिंकला आहे."- आशिष शेलार, प्रभारी मुंबई भाजप