आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. भाजप सातत्याने आरपीआयकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांनी राज्यातील विविध शहरांमधील जागावाटपाबाबत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. रामदास आठवले म्हणाले की, "नागपूर, अमरावती आणि संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आम्हाला जागा नाकारण्यात आल्या. नालासोपारा आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये आरपीआयला एकही जागा दिली गेली नाही, तर भिवंडीत केवळ एका जागेवर आमची बोळवण करण्यात आली. भाजपला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असला, तरी त्यांनी मित्रपक्षाचाही विचार करायला हवा, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या रणनीतीवर ताशेरे ओढले.
मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यामुळे आठवलेंनी कठोर पाऊल उचलले आहे. मुंबईत भाजप आणि शिंदेसेनेसोबतची युती आरपीआयने अधिकृतपणे तोडली आहे. मुंबईतील ३८ जागांवर आरपीआय स्वबळावर लढणार आहे. "रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे प्रचंड संताप आहे. भाजप नेत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. आता आम्ही मुंबईत स्वबळावर लढू", असे आठवले यांनी ठामपणे सांगितले.
महायुतीसमोर पेच
रामदास आठवले यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत महायुतीच्या मतांच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दलितांची मोठी मतपेढी असलेल्या आरपीआयने वेगळी चूल मांडल्यामुळे भाजप आणि शिंदेसेना आता काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.
Web Summary : Ramdas Athawale declared RPI will fight Mumbai elections independently due to dissatisfaction with BJP's seat allocation. He cited neglect in key cities and lack of consideration for RPI, impacting the alliance's prospects.
Web Summary : रामदास आठवले ने भाजपा के सीट आवंटन से असंतुष्ट होकर घोषणा की कि आरपीआई मुंबई चुनाव स्वतंत्र रूप से लड़ेगी। उन्होंने प्रमुख शहरों में उपेक्षा और आरपीआई के लिए विचार की कमी का हवाला दिया, जिससे गठबंधन की संभावनाओं पर असर पड़ेगा।