Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. माहीम मतदारसंघात काय होणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवले होते. पण अमित ठाकरे पिछाडीवर पडले असून, तिसऱ्या स्थानी गेले आहेत. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होती. मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यस्थी करून प्रयत्न केले. परंतु, सदा सरवणकर यांनी माघारी घेतली नाही.
भाजपाने शब्द फिरवल्याचा मनसे नेत्यांचा आरोप
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने ऐनवेळी शब्द फिरवला. सुरुवातीला भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. आम्ही अमित ठाकरेंना समर्थन देणार असल्याचे बोलले होते. परंतु, त्यानंतर अखेरच्या क्षणी भाजपाने आपला शब्द पाळला नाही, अशी तीव्र नाराजी प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली. यावर केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले. केशव उपाध्ये म्हणाले की, मनसे महायुतीचा भाग नव्हती. माहीमची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो निर्णय होता. आशिष शेलार यांनी समर्थन देण्याबाबत प्रयत्न केले होते. पण माहीम मतदारसंघातील उमेदवारी आणि त्याविषयीचे निर्णय घेणे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याचकडे होते. त्यामुळे असे आरोप करणे चुकीचे आहे, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, अमित ठाकरे यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवायचे होते, तर कमीत कमी दोन ते तीन महिने मनसेने महायुतीशी बोलणी सुरू करायला हवी होती. परंतु, मनसेने अमित ठाकरेंना अखेरच्या क्षणी रिंगणात उतरवले. परंतु, या आधीच वाटाघाटी करणे अपेक्षित होते, असे स्पष्ट मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, ११ वाजेपर्यंत झालेल्या ४ थ्या फेरीपर्यंत ठाकरे गटाचे महेश सावंत ९ हजार मतांनी आघाडीवर होते. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर दुसऱ्या स्थानी असून, त्यांना ६ हजार मते मिळाली आहेत. तर मनसे उमेदवार अमित ठाकरे ४ हजार मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत.