मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा निसटता विजय झाला आहे. दुसऱ्या नंबरवर सदा सरवणकर यांचा दीड हजार मतांनी पराभव झाला आहे.
माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उभे राहिले होते. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीत उमेदवार देणार का अशी चर्चा होती. परंतु शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. अखेर महायुतीने सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात महेश सावंत, सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांची तिरंगी लढत पाहायला मिळाली. त्यात अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्या लढतीत सावंत १५०० हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपा त्यांना पाठिंबा देईल असं मनसेला वाटत होते. मात्र महायुतीत सदा सरवणकरांची उमेदवारी जाहीर केल्याने मनसेला एकाकी लढावे लागले. यात आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे अमित ठाकरे निवडून यावे अशी आमची इच्छा होती. परंतु सरवणकरांनी मांडलेले लॉजिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटल्याने त्यांनी सरवणकरांना उमेदवारी दिली. मात्र महायुतीत समन्वयाचा अभाव झाल्याने अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या भांडणात महेश सावंत यांचा फायदा झाला. महेश सावंत यांनी अखेरच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. माहीम मतदारसंघात महेश सावंत यांना ४६ हजार ५७९ मते मिळाली तर सदा सरवणकर यांना ४५ हजार २३६ मते पडली. त्यात अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले. अमित ठाकरे यांना ३० हजार ७०३ मते मिळाली.
शिवडीत बाळा नांदगावकर यांचाही पराभव
शिवडीत महायुतीकडून मनसेचे बाळा नांदगावकर हे निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरची सभा शिवडीत घेतली होती. मात्र याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून अजय चौधरी यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. अजय चौधरी यांना १८ व्या फेरी अखेर ७१ हजार ८८८ मते मिळाली तर बाळा नांदगावकर यांना ६३ हजार ८४६ मते पडली. जवळपास ८ हजार मतांनी नांदगावकरांचा पराभव झाला आहे.