"भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?"; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:14 IST2026-01-21T13:53:07+5:302026-01-21T14:14:53+5:30

हरल्यानंतर समाधान सरवणर भाजपवर खापर फोडत आहेत. लोक त्यांच्यावर नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया अक्षता तेंडुलकर यांनी दिली.

Mahayuti War Should BJP Workers have washed your dishes Akshata Tendulkar slams Samadhan Sarvankar over Betrayal claims | "भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?"; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या

"भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या घरची भांडी घासायची होती का?"; सरवणकरांच्या आरोपावर अक्षता तेंडुलकर संतापल्या

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दादर-माहिम भागातील शिंदेसेनेचे मातब्बर उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट मित्रपक्ष भाजपवर फोडले आहे. भाजपमधील एका टोळीने आपला पराभव केल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटही समोर आल्याचा दावा सरवणकर यांनी केला. या आरोपांवर आता भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी प्रत्युत्तर दिलं. 

प्रभाग क्रमांक १९४ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे यांनी सरवणकर यांचा पराभव केला. यावर बोलताना समाधान सरवणकर म्हणाले, "माझ्या विरोधात विरोधी पक्षाचे ५ आमदार आणि दोन्ही पक्षप्रमुखांची मुले मैदानात उतरली होती. संपूर्ण शक्ती मला पाडण्यासाठी लावली जात असतानाही मतदार माझ्या पाठीशी ठाम होते. पण, ऐनवेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक टोळीने पाठ फिरवली."

सरवणकर यांनी यावेळी काही धक्कादायक पुरावे सादर केले. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲप मेसेज करून "सरवणकरांचे काम करू नका, त्यांना पाडायचे आहे," असे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केला. "वरिष्ठांकडून काहीतरी वेगळा निरोप आला आहे, असे भासवून खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली. यामुळेच हक्काची मते विभागली गेली आणि आमचा विजय थोडक्यात हुकला," असेही सरवणकर म्हणालले.

शीतल गंभीर आणि प्रिया सरवणकरही रडारवर होत्या!

ही केवळ एका प्रभागापुरती मर्यादित टोळी नसून, हीच टोळी भाजपच्या अधिकृत उमेदवार शीतल गंभीर यांना पाडण्यासाठीही सक्रिय होती, असा खळबळजनक दावा सरवणकरांनी केला. तसेच आपली बहीण प्रिया सरवणकर यांच्या पराभवामागेही याच टोळीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

"तुमचा पराभव ही लोकांची नाराजी"- अक्षता तेंडुलकर

सरवणकरांच्या या गंभीर आरोपांनंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी सरवणकरांचे दावे फेटाळून लावले. "समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांच्या प्रत्येक प्रचारफेरीमध्ये फक्त भाजप दिसत होते. प्रत्येक भाजप पदाधिकारी, बूथ प्रमुखांनी १५ दिवस मन लावून मेहनत केली. यांच्याकडे वोट बँक नाही. हरल्यानंतर ते भाजपवर खापर फोडत आहेत. लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मराठी मतांचे ध्रुवीकरण झालेले आहे, असे तेंडुलकर म्हणाल्या. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमची कामे केली नाहीत असा आरोप केल्याबाबत विचारले असता अक्षता तेंडुलकर संतापल्या. "म्हणजे तुमच्या अपेक्षा काय आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या घरी येऊन भांडी घासायला हवी होती का? घोषणा देण्याचे कामही आमचे कार्यकर्ते करत होते. यांच्याकडे चार माणसं नव्हती. एवढं करुन तुम्ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करताय. हे आम्ही का सहन करायचं," असं तेंडुलकर यांनी म्हटलं. त्यांनीच तयार केलेल्या खोट्या मेसेज विरोधात आम्ही सायबर क्राईमकडे तक्रार करणार आहोत, असा इशाराही अक्षता तेंडुलकर यांनी दिला.

Web Title : चुनाव हार के बाद, बीजेपी कार्यकर्ता के बर्तन धोने के सवाल पर गुस्सा।

Web Summary : सरवणकर ने चुनाव हार का दोष बीजेपी पर डाला; तेंदुलकर ने बीजेपी के समर्थन पर प्रकाश डालते हुए दावों का खंडन किया। उन्होंने सरवणकर की उम्मीदों पर सवाल उठाया, और विश्वासघात के आरोपों का विरोध किया।

Web Title : BJP worker's dishwashing demand sparks fury after election loss blame.

Web Summary : Sarvankar blames BJP for election loss; Tendulkar refutes claims, highlighting BJP support. She questions Sarvankar's expectations, countering his accusations of betrayal.