Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या निलंबनावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 20:26 IST

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

विदर्भातील, मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय भागातील प्रश्न विचारात घेऊन विरोधी पक्षाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात येणार होता. यात सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, नागपूर येथील भूखंड प्रकरण अशा विविध विषय मांडण्यात येणार असताना सत्ताधारी पक्ष काही वेगळ्याच भूमिकेत असल्याची शंका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर उपस्थित केली.

जी व्यक्ती आपल्यात हयात नाही तिच्याविषयी काही वक्तव्य करून सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली. मात्र विरोधकांनाही आपली भूमिका मांडायची होती. सभागृह चालताना दोन्ही पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळायला हवी होती परंतू असे आज झाले नाही, याउलट नवीन आमदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या बहुमताच्या जोरावर केला, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. 

Maharashtra Winter Session: मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांना अपशब्द, जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

याच भूमिकेला पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचा राग असह्य झाला. ते या सभागृहाचे मागील ३२ वर्षापासून सदस्य आहेत त्यांनी अनेक विभागाच्या जबाबदार्‍या स्विकारल्या आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आमचा पक्ष काम करतो आहे. ते अतिशय शांतपूर्ण, समन्वयाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. असे असताना कुठेतरी एखादा शब्द चुकून गेला असताना इतकी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही असे मत सर्व विरोधी पक्षातील मित्रपक्षांनी मांडले, असेही अजित पवार म्हणाले. 

राजकारण आम्हाला जमतं, आम्हीदेखील राजकारण करणारी माणसं आहोत असे बोलत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर अजित पवार यांनी टोला लगावला. पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं तर आमदारांना शांत राहण्याची भूमिका घेता येऊ शकते असेही ते म्हणाले. 

आज आमच्या हक्काचा विरोधी पक्षाचा ठराव होता यातून विदर्भाच्या मागासलेल्या भागाकरीता, शेतकऱ्यांकरीता, कामगारांकरीता, विद्यार्थी विद्यार्थिनींकरीता विषय होता. यावर सत्ताधाऱ्यांनी कोणतीही समंजस भूमिका घेतली नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. 

सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विरोधी पक्षाच्यावतीने निषेध व धिक्कार करण्यात आला आहे, यासाठी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने सभात्याग करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही अजित पवार म्हणाले. 

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  हक्काचे ठिकाण विधीमंडळ : अजित पवार

आम्हाला कोणत्याही प्रकारचे वेगळे वातावरण राज्यात, विधीमंडळात निर्माण करायचे नाही. मात्र आम्हाला जनतेने ज्या कारणासाठी निवडून दिले आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी आमचे हक्काचे ठिकाण विधीमंडळ असते. या सरकारकडून मागील पाच महिन्यांपासून ज्या चूका घडल्या आहेत, त्यासाठी सभागृहाच्या आयुधांचा वापर करून ते जनतेच्या समोर आणायचे होते यासाठी विरोधी पक्षाने पहिल्या दिवसापासून सुरुवात केली होती. मात्र आज सत्ताधाऱ्यांचा रागरंग पाहला तर त्यांच्या मनामध्ये पहिलेच काही वेगळच ठरवून ते आले होते, यासाठी लोकांचे लक्ष एका ठिकाणाहून दुसरीकडे विचलीत करायचे हे आजच्या कामातून पाहायला मिळाले असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी हे बरोबर केले नाही असे विरोधकांचे स्पष्ट मत झाले आहे. एखाद्या वरीष्ठ नेत्याबद्दल इतक्या टोकाचा निर्णय घेण्याची गरज नव्हती असेही स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार