Join us

नगरमधील सैराट हत्याप्रकाराबाबत राज्य महिला आयोग गंभीर, अहवाल मागवला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:54 IST

नगरमधील सैराट हत्याप्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या सदस्या मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पोलिसांनी पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे.

मुंबई/अहमदनगर: आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडला. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या पतीवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले असून पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे बजावण्यात आले. 

नगरमधील सैराट हत्याप्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या सदस्या मंजुषा सुभाष मोळवणे यांनी पोलिसांनी पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे. राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत कलम 10 (1) (फ) (एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र महिला आयोगास महिलांशी निगडीत प्रकरणे स्विकारणे आणि त्याची दखल घेण्याचे अधिकार प्राप्त असल्याचे आयोगाने पत्रात म्हटले आहे. तसेच, अहमदनगरमधील सैराट हत्याप्रकरणाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. याप्रकरणी आपल्याकडून कोणती कारवाई करण्यात आली. सदर कृत्य अतिशय गंभीर असून या प्रकरणाची माहिला आयोगाने गांभिर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. आपण व्यक्तीश: लक्ष घालून योग्य ती उचित कारवाई करावी, असे आयोगाच्या अध्यक्षांनी पोलीस अधिक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच याबाबतच्या कारवाईचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला त्वरीत पाठवावा, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी मुलीच्या मामा व काकाला अटक केली असून वडील फरार आहेत. रूक्मिणी मंगेश रणसिंग (वय १९, रा. निघोज, ता. पारनेर) असे मृत मुलीचे नाव आहे. पती मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे जखमी आहेत. मंगेश व रूक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यांचा आंतरजातीय विवाह होता. मंगेश हा निघोज येथे गवंडी काम करायचा. रूक्मिणीचे वडील, काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे ‘एक ना एक दिवस त्यांचा काटा काढायचा’ असा या तिघांचा प्रयत्न होता. ते निमित्त अखेर त्यांना मिळाले. पती-पत्नीमध्ये स्वयंपाक करण्यावरून भांडण झाले होते. त्यामुळे रूक्मिणी माहेरी निघून गेली होती. 

टॅग्स :अहमदनगरखूनमहाराष्ट्रपोलिसगुन्हेगारी