Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:34 IST2025-01-07T19:32:46+5:302025-01-07T19:34:16+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी मनसेला महायुतीत येण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान
एकनाथ शिंदे यांना दोष देऊ नये. तुमचे ध्येय एकच असेल, तर तुम्ही हिंदुत्ववादी पक्षासोबत किंवा युतीसोबत असले पाहिजे, असे विधान शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे तयारी सुरू केली असून, त्यापार्श्वभूमीवर कदम यांनी हे विधान केले.
योगेश कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले, ""लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. लोकसभेला पाठिंबा जाहीर करताना त्यांनी फक्त लोकसभेपुरता असल्याचे सांगितले होते. पुढचे निर्णय नंतर घेऊ असे त्यांनी सांगितले होते."
एकनाथ शिंदेंना दोष देऊ नये -योगेश कदम
"विधानसभेला त्यांनी युती करायला हवी होती. विधानसभेबद्दल त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता. एकनाथ शिंदेंवर आरोप करून आपण (मनसे) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ध्येय जर तुमचं एकच असेल? हिंदुत्व जर तुमचा खरा मुद्दा असेल, तर मला वाटतं की हिंदुत्ववादी पक्षासोबत किंवा युतीसोबत असले पाहिजे असे आमचे प्रामाणिक मत आहे", अशी भूमिका योगेश कदम यांनी मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेत महायुतीतील मनसेच्या सहभागी होण्याबद्दल चर्चा झाली. शिंदेंमुळे सहभागी होण्याचा निर्णय रखडला.
याच बैठकीत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. वाटाघाटी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाणार आहे. मनसेच्या पहिल्या फळीतील नेते राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहेत, असेही या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.