Join us

सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी; 'धनुष्यबाण'बाबतही याच आठवड्यात निर्णय होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 06:39 IST

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार तसेच महत्त्वाचे मु्द्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई : ठाकरे-शिंदे गटांतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी ठाकरे गटाने हे प्रकरण पाचऐवजी सातजणांच्या घटनापीठाकडे सोपवावे अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाकडून मंगळवार, १० जानेवारी ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी होणाऱ्या या सुनावणीत सत्तांतराचा तिढा सुटणार की हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणीसाठी जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार तसेच महत्त्वाचे मु्द्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. याविषयी पाचजणांचे घटनापीठ महत्त्वाचे निरीक्षण पहिल्या सुनावणीत नोंदविण्याची शक्यता आहे.  त्यामुळे १० जानेवारीला ही सुनावणी सुरू होते की, नवीन खंडपीठ स्थापन केले जाणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१६ साली नबाम राबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष या प्रकरणात पाचजणांच्या खंडपीठाने निकाल दिला होता. त्यामुळे ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल पाचजणांच्या खंडपीठाकडूनच दिला जातो की सातजणांचे खंडपीठ नेमले जाते, याबाबत मंगळवारी होणाऱ्या सुनावणीतच निर्णय होईल.

धनुष्यबाणाबाबतही याच आठवड्यात सुनावणीची शक्यता

डिसेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी जानेवारीत पुढील सुनावणी होईल असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार १२ किंवा १३ जानेवारीला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष या संदर्भात दोन्ही गटाकडून दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी हाेण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रांनुसार पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे ही बाब निवडणूक आयोगाकडूनच निश्चित केली जाणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनासर्वोच्च न्यायालय