Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
By संतोष कनमुसे | Updated: April 19, 2025 15:59 IST2025-04-19T15:52:11+5:302025-04-19T15:59:38+5:30
Maharashtra Politics : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
Maharashtra Politics ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे. "कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. या वक्तव्यावरुन आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
"राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असेल कर मिटवायला वेळ लागत नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे, महाराष्ट्राच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांच्याविरोधात आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये. ठीक आहे पंचवीस वर्षे आमची युती होती. त्यातला काही काळ राज ठाकरेही सहभागी होते. पण, शिवसेना तोडून महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांविरोधातील काळे कायदे, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असताना सुद्धा आपण या शक्तींबरोबर राहणे योग्य नाही, महाराष्ट्राला हे परवडणारे नाही ही भूमिका आमची आजही आहे, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
'...तर त्यांचं स्वागत आहे'
संजय राऊत म्हणाले, आता उद्धवजींनी सांगितले आहे. त्यांनी नम्रपणे सांगितले आहे. काही शक्ती महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचे नुकसान व्हावे यासाठी पडद्यामागून कारस्थान करतात. या लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा लोकांना आम्ही घरातही घेणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनतर आम्ही चर्चेला किंवा पुढचे जे काही म्हणणे आहे ते सांगू, असंही खासदार राऊत म्हणाले.
'आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाहतोय'
"महाराष्ट्राची परिस्थिती सध्याची गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळे. आम्ही आमच्या दारामध्ये अशा लोकांना कधीही थारा देणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि याचं भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरे यांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणे गरजेचा आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे यांना ठाकरे हे नाव मिटवायचे आहे. अशावेळी दोन्ही ठाकरे बंधुंनी साद आणि प्रतिसाद दिली असेल तर याची महाराष्ट्र स्वागत करत आहे. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पण, आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या विषयाकडे पाहत आहोत, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.