Maharashtra Politics : 'काल काय घडले ते मला समजले, शिंदे सरकार दोन महिन्यांत पडणार'; संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:55 IST2023-06-14T12:30:57+5:302023-06-14T13:55:30+5:30
Maharashtra Politics : काल राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या.

Maharashtra Politics : 'काल काय घडले ते मला समजले, शिंदे सरकार दोन महिन्यांत पडणार'; संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई- काल राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या. या जाहिरातीमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असं शीर्षक होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते, यात कुठेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य कोणत्याही नेत्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, आरोप- प्रत्यारोपही झाले. आज दुसऱ्याच दिवशी राज्यातील वर्तमानपत्रात आणखी एक जाहिरात देण्यात आली, यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यावरुन आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार सजंय राऊत (Sanjay Raut) यांनीही टीका केली असून येत्या दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा मोठा दावा केला आहे. (Maharashtra Politics )
“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिंदे गटाचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघे नाहीत, देवेंद्र फडणवीसही नाहीत हे कालच्या जाहिरातीवरुन स्पष्ट झालंय. आज जाहिरातीत फोटो बदलले असले तरीही त्यांच्यामध्ये आलबेल नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळे आज नवीन जाहिराती आल्या. सर्वाच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे, विधानसभा अध्यक्षांना कधीतरी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. येणाऱ्या दोन महिन्यात हे सरकार पत्त्याच्या पानासारखे कोसळेलं, असा मोठा दावाही संजय राऊत यांनी केला.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मिरला भेट दिली. तिथे कोणत्याा हॉटेलला थांबले, कुणाकुणाला भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली याची सर्व माहिती आहे. लवकरच त्या उघड करणार, असंही राऊत म्हणाले. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंना हे लोक विसरले. देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे, राज्यात हे काय सुरू आहे याचं वारं जर कानात शिरले तर कान दुखणारच. फडणवीसांची नाराजी समजून घेतली पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. (Maharashtra Politics )
'विरोधकांवर धाडी टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न'
तामिळनाडूमधील ईडी धाडीवर बोलताना राऊत म्हणाले, विरोधकांवरती अशा प्रकारच्या धाडी घालून दहशत निर्माण करणे , दबाव निर्माण करणे हा या मागचा खेळ आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार हे ईडीचे प्रॉडक्ट आहे. दादा भुसे यांच्या विषयी पुढील दोन दिवसांमध्ये ईडीकडे तक्रार करणार आहे. सीबीआय कडे तक्रार करून झालेली आहे. राहुल कुल यांचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. भीमा साखर कारखाना ही देखील तक्रार माझ्याकडून झालेली आहे, असंही राऊत म्हणाले.