Join us

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:52 IST

Maharashtra Politics : मुंबईतील वरळी येथे एका कार्यक्रमानिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली.

राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेसाठीही सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, मागील तीन वर्षापासून एकमेकांच्या विरोधात असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकाच मंचावर येणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५५६ लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.

आमदार आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत आणि प्रोटोकॉलनुसार त्यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येतील का अशा चर्चा सुरू आहेत.  म्हाडाने माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते चाव्या वाटप केले जाणार आहे.

“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट

श्रेय घेण्यासाठी राजकीय वाद

कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आहे. याशिवाय वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले आणि नंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरही  सुरू राहिले. आता त्याचा पहिला टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. दरम्यान, आता या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय वाद सुरू आहे.

बीबीडी प्रकल्प  काय आहे?

१४ ऑगस्ट रोजी होणारा हा कार्यक्रम केवळ चाव्या वाटपापुरता मर्यादित राहणार नाही तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो. प्रत्यक्षात, १९२० ते १९२५ पर्यंत मुंबई विकास विभागाच्या अंतर्गत ब्रिटिश काळात मुंबईत निवासी इमारती बांधल्या गेल्या. आता या खूप जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा पुनर्विकास केला जात आहे. सध्या त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारतातील ब्रिटिश काळात केलेल्या नागरी विकासाअंतर्गत हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र