Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:05 IST2025-03-04T10:04:08+5:302025-03-04T10:05:08+5:30
Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Politics : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बोलले जात आहे. देशमुख यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे, तर रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
Santosh Deshmukh Case : 'भर चौकात शंभर गोळ्या घाला'; संतोष देशमुखांचे फोटो पाहून मनोज जरांगे संतापले
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू होती तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात 'मनाई हुकूम जारी'
जिल्ह्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणी आंदोलने सुरू आहेत. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी आंदोलन सुरू आहे. यासह इतर बाबींमुळे अचानक घडणाऱ्या घटनांवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे.
जरांगे पाटलांनी केली टीका
मनोज जरांगे पाटील म्हणाले, संतोष अण्णाला कपडे काढून मारलं, त्यांचे फोटो पाहून काळीज हेलावून जातंय. एवढी क्रूरता करण्याचं धाडसं कसं झालं? आता तरी अजित पवार आणि फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना लाथ मारुन बाहेर काढावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आमदारकीसह सगळ्याच पदांचा राजीनामा द्यावा, स्वतःहून जेलमध्ये जावं अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.