Join us

Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:29 IST

मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे.

मुंबई : हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतैक्य दिसत आहे. त्याचवेळी सत्तारुढ महायुतीत मतैक्याचा अभाव असल्याचे चित्र आहे.

मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे भिडू असतील का अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते केवळ मोर्चासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. 

पुढचे राजकारणही ते खांद्याला खांदा लावून करतील की नाही या बाबत स्पष्टता नाही. मात्र, त्याची सुरुवात म्हणून ५ जुलैच्या मोर्चाकडे बघितले जात आहे. दोन ठाकरे एकत्र आले तर ते महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार गट या दोन पक्षांना मान्य असेल का या बाबतही अद्याप स्पष्टता नाही. 

या मोर्चात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकवटणे हा महायुतीसाठी चिंतेचा विषय असेल, असे राजकीय जाणकारांना वाटते. 

महायुतीचे नेते एकासुरात बोलताना दिसत नाहीत. पहिली ते चौथी हिंदी नसावी, पाचवीपासून हिंदीची सक्ती करावी असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांची अडचण झाली आहे. 

कुठलाही निर्णय लादला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असून त्यांच्या पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांची समजूत घालताना दिसले. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, विरोधक खोटे नरेटीव्ह सेट करत आहेत.

टॅग्स :महाविकास आघाडीमहायुतीएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशरद पवार