विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:16 IST2023-07-17T14:12:43+5:302023-07-17T14:16:18+5:30
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार कोणती भूमीका घेणार ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराचा यात समावेश नव्हता यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या, यावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Monsoon Session)
माझ्याविरोधात अविश्वास असेल तर...; नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना सुनावले, नेमकं काय घडले?
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या सरकार विरोधी घोषणाबाजीवेळी राष्ट्रवादीचे आमदार का उपस्थित नव्हते, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार सचिन अहिर म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून काल आमची बैठक झाली. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनेक नेते आले होते. आज पहिलाच दिवस असल्याने अजून काही लोक आलेले नाहीत. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमीका आहे ते महत्वाच आहे. मतदारांना काय ते उत्तर द्याव लागणार आहे.
"आपआपल्या राजकीय भूमीका स्पष्ट कराव्या लागणार आहेत. आम्ही महाविकास आघाडीतील सर्वच विरोधी फक्ष एकसंघ आहोत. सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा दिला आहे. आमची तुम्ही संख्या कमी करु शकता पण आवाज दाबू शकत नाहीत. गोंधळाची परिस्थिती सत्ताधारी करत आहेत, असंही सचिन अहिर म्हणाले.
सचिन अहिर म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आणि आदित्य ठाकरे आज कर्नाटकात विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी जाणार आहेत, असंही अहिर म्हणाले. (Maharashtra Monsoon Session)
राष्ट्रवादी काँग्रेसचे 'हे' आमदार बसले विरोधी बाकावर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे आठ आमदार आज उपस्थित होते. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे हे आमदार आज उपस्थित होते. शरद पवार गटाचे हे आमदार विरोधी बाकावर बसले होते.