'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:01 IST2023-07-18T14:00:00+5:302023-07-18T14:01:10+5:30
Maharashtra Monsoon Session : भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली.

'कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, प्रकरणाची चौकशी करणार; व्हिडीओ प्रकरणी फडणवीसांची माहिती
मुंबई- भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चौकशीची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला विषय नक्कीच गंभीर आहे. आपल्याकडे काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी आमच्याकडे द्या. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. किरीट सोमय्या यांनीही चौकशीची मागणी केली आहे आणि विरोधी पक्षांनीही मागणी केली आहे. याप्रमाणे संपूर्ण चौकशी केली जाणार आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आज विधिमंडळात या प्रकरणी विरोधी पक्षांनी चौकशीची मागणी केली. आमदार अनिल परब यांनीही बोलताना हल्लाबोल केला. अनिल परब म्हणाले, खोटे आरोप जेव्हा होतात तेव्हा तुमच्या मुलांना यंत्रणे समोर घाणेरडे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न फक्त किरीट सोमय्या किंवा आणखी कोणाचा नाही हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणाऱ्यांचा आहे. आयुष्य पणाला लावून इथे आलेली लोक असतात तेव्हा असा बदनामीचा आघात होतो. कोणाचही राजकीय आयुष्य उद्वस्त होऊ नये असंच वाटतंय आम्हाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही परब म्हणाले. (Maharashtra Monsoon Session)