“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:24 IST2025-07-07T16:21:43+5:302025-07-07T16:24:24+5:30

Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

maharashtra monsoon session 2025 uddhav thackeray replied bjp and cm devendra fadnavis over criticism on marathi issue vijay melava | “हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार

“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार

Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: मराठी माणसासोबत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही आम्ही दोन भाऊ एकत्र आल्याबाबत आनंद व्यक्त केला. तुम्ही केले, ते चांगले केले, असे अनेकांनी मला सांगितले. परंतु, यासाठी भाजपाच्या बुडाला आग लागणे स्वाभाविक आहे. भाजपाचे राजकारणच तोडा, फोडा आणि राज्य करा, असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या, हाच भाजपाचा धंदा आहे आणि तो संपलेला आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. 

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे, भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपा नेत्यांनी केलेल्या विधानांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले आणि पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. 

आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही, भाषेच्या सक्तीला विरोध आहे

महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा आहेच. त्या भाषेसाठी जे-जे करण्याची गरज लागेल, ते-ते आम्ही करू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्ही इथे आनंदाने राहत आहोत, पण काही लोक आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही काहीही बोला, तुम्हाला इथे कुणीही ओळखत नाही. इथे येऊन त्यांनी पाहावे. आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही, भाषेच्या सक्तीला विरोध आहे. तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का? मिळत कसे नाहीत?

बाहेरची लोक इथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांचे घर पाहावे. त्यांचा पक्ष जो मेलेला आहे, तो पक्ष जिवंत होतो का, ते आधी बघावे. मराठी माणूस आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतो, पण याची तुलना भाजपावाले पहलगाम हल्ल्याशी करत आहेत, हेच मराठीचे आणि महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. ही माणसे अगदी खालच्या पातळीला गेलेली आहेत. आम्ही आमचे पाहून घेऊ. पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का? मिळत कसे नाहीत? ज्यांनी आमच्यावर आरोप केले, त्यांच्या घरात राहत आहेत का? लाज वाटली पाहिजे. हिंदुंना वाचवू शकत नाहीत आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता, हे असे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात दुर्देवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

दरम्यान, मूळ भाजपा पक्ष मेलेला आहे. या लोकांनी तो पक्ष मारून टाकला. मूळ भाजपा पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. या लोकांनी ऊर बडवायलाही बाहेरचे लोक घेतले आहेत. रुदाली हाही हिंदी शब्द आहे. त्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही एकत्र आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली आहे. ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि क्षमवता पण येत नाही. करणार काय? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

 

 

Web Title: maharashtra monsoon session 2025 uddhav thackeray replied bjp and cm devendra fadnavis over criticism on marathi issue vijay melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.