Join us

महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:57 IST

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: राज ठाकरेंचा लोकसभा निवडणुकीत आम्हाला फायदा झाला. पण विधानसभेला त्यांना जागा देणे शक्य नव्हते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत सूचक विधान केले.

Maharashtra Mahayuti Govt Swearing-in Ceremony: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एनडीएतील राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज उद्योगपती, अभिनेते-कलाकार, क्रिकेट विश्वातील मंडळी, संत-महंत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन आमदारांना शपथबद्ध केले जाणार आहे. यातच राज ठाकरेमहायुती सरकारमध्ये सहभागी होणार का, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. 

यंदाची विधानसभा निवडणूक राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने स्वबळावर लढली होती. परंतु, मनसे पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. राजपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह सर्व उमेदवार पराभूत झाले. एकमेव आमदार असलेले राजू पाटील हेही आपली आमदारकी वाचवू शकले नाहीत. दारुण पराभवानंतर मनसे पक्षाच्या मान्यतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे. यातच आता ठाकरे गटाने महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून, उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू पक्षांनी चाचपणी करण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. 

महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच

लोकसभेत त्यांनी आम्हाला खुलेपणाने पाठिंबा दिला. आम्हाला त्याचा फायदा झाला. विधानसभेत आमच्या हे लक्षात आले की, त्यांच्यासमोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले. पण त्यांना मते चांगली मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मते घेतली आहेत. मला वाटते की, त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान, माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचे अभिनंदन. २०१९ ला खरेतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडले त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो. पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकत आहे, लोकांना गृहीत धरत आहे, असे जर जाणवले, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसले तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसेच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा!, अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी महायुतीला मनसे शुभेच्छा दिल्या होत्या. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेमनसेभाजपामहायुतीमुंबई महापालिका निवडणूक २०२२