Maharashtra Lockdown: Freedom of communication, not 'ban' !; The idea of shutting down petrol, groceries, vegetables | Maharashtra Lockdown : ‘बंदी’ नव्हे, ही संचारमुक्ती !; पेट्रोल, किराणा, भाजीपाला बंद करण्याचा विचार

Maharashtra Lockdown : ‘बंदी’ नव्हे, ही संचारमुक्ती !; पेट्रोल, किराणा, भाजीपाला बंद करण्याचा विचार

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये नागरिकांचा मुक्त संचार दिसून आला. सकाळी बाजारपेठांमध्ये बहुतांश दुकाने सुरू होती. ज्या दुकानांना टाळे दिसत होते, ती मागच्या दाराने सुरू होती. रस्त्यांवर फळ, भाजीविक्रेत्यांची गर्दी कायम होती. अपवादवगळता पोलीसदेखील रस्त्यावरील नागरिकांना अटकाव करताना दिसत नव्हते. 
महानगरी मुंबई दुपारी साडेबारापर्यंत नेहमीसारखीच धावताना दिसली. सर्व प्रमुख बाजारपेठांसह छोट्या बाजारपेठा आणि दुकाने सरसकट सुरू होती. दादर मार्केटला तर नेहमीप्रमाणे जत्रेचे स्वरूप होते. लोकलसह बेस्ट भरभरून धावत होत्या.
भायखळा, कुर्ला, घाटकोपर, अंधेरीसह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर नेहमीसारखी गर्दी नसली तरी संचारबंदी कुठाय, असा प्रश्न 
पडत होता. दुपारनंतर मात्र रस्त्यावरील वर्दळ बऱ्यापैकी कमी झाल्याचे 
चित्र होते.
नागपूर, अमरावती, पुणे, अहमदनगर या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असणाऱ्या शहरांमध्येही फारसे वेगळे चित्र नव्हते. पुणे शहरात संचारबंदीचा दुसरा दिवस असूनही रस्त्यावरची गर्दी कायम होती. पोलीसही कोणाला हटकत नव्हते. त्यामुळे संचारबंदी नावालाच असे चित्र होते. नागपुरातील बाजारपेठांमध्ये नेहमीसारखीच तुडुंब गर्दी होती. औरंगाबाद, नांंदेडमध्येही रस्त्यावरील वर्दळ कायम होती. कोल्हापूर, सातारा शहरामध्ये पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली तरी नागरिक बिनधास्त फिरताना दिसत होते.

पाेलिसांची पाठ फिरताच नियमांचे उल्लंघन
पोलिसांच्या गाड्या गस्त घालत असतानाच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात होते, त्यांची पाठ फिरताच पुन्हा गर्दी होत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी हाेते. शहरांमध्ये पोलिसांनी बॅरिकेड‌्स लावले असले तरी तेथेही कोणतीच विचारणा होत नसल्याने नागरिकांचा बिनधास्त संचार सुरू होता. त्यातुलनेत ग्रामीण भागात मात्र शांतता होती.

कशी ओसरणार कोरोनाची लाट?
- संचारबंदी लागू करूनही लोक रस्त्यावर फिरत आहेत, आता शुक्रवारपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल आणि कोणीही असले तरी कठोर कारवाई केली जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. 
- गरज भासल्यास पेट्रोल, किराणा, भाजीपाल्याची दुकाने बंद करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला.
- वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईची जीवनरेषा असलेली लोकल सेवा सुरू राहील. पण, ती केवळ अत्यावश्यक सेवांसाठी. 
- पेट्रोल पंप बंद ठेवायचे किंवा संबंधित प्राधिकाऱ्याचे पत्र ज्याच्याकडे आहे, अशा अत्यावश्यक सेवेतील व्यक्तिलाच पेट्रोल - डिझेल द्यायचे या पर्यायांवर शासन विचार करीत आहे. 
- भाजीपाला, किराणा दुकानांच्या वेळा आणखी मर्यादित करण्याचाही विचार आहे. लोक गर्दीच करत असतील तर मग उद्या ते बंद करण्यावरही विचार करावा लागेल. याबाबत अधिक कडक नियम कसे करता येतील, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Lockdown: Freedom of communication, not 'ban' !; The idea of shutting down petrol, groceries, vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.