Maharashtra Lockdown : खरेदीसाठी बाजारपेठांत नागरिकांची झुंबड, लॉकडाऊनची धास्ती, साठा करण्याकडे कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:24 IST2021-04-15T05:29:38+5:302021-04-15T07:24:42+5:30
Maharashtra Lockdown : संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी होती. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी ठाणे नगर पोलीस कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करीत होते, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते.

Maharashtra Lockdown : खरेदीसाठी बाजारपेठांत नागरिकांची झुंबड, लॉकडाऊनची धास्ती, साठा करण्याकडे कल
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री लॉकडाऊनबाबत अधिकृत निर्णय जाहीर केल्यानंतर धास्तावलेल्या नागरिकांनी बुधवारी सकाळीच बाजारपेठांत धाव घेतली. किराणा मालासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
मुंबईतील सर्व किराणा मालाची दुकाने, सुपर मार्केटमध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. डी-मार्टसमोर तर लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी टोकन पद्धतीने ग्राहकांना बोलावले जात होते, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष रांगेत उभे राहूनच सामान घ्यावे लागत होते. या साऱ्या धडपडीत कोणालाही अंतर नियमांचे भान नव्हते. कांजूरमार्ग, चांदिवली, मुलुंडमधील डी-मार्टबाहेर रांगेत घुसखोरीवरून कडाक्याची भांडणे झाल्याचे प्रकारही घडले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपले ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करीत असताना सर्वसामान्यांच्या रोषामुळे त्यांनाही रांगेत उभे राहून वाणसामान खरेदी करावे लागले. त्याचप्रमाणे गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसी बळाची मदत घेण्याची वेळही काही दुकानमालकांवर ओढवली. संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी होती. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी ठाणे नगर पोलीस कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करीत होते, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते. असेच चित्र जिल्ह्यातील इतर शहरांतही थोड्याफार फरकाने होते.
नवी मुंबई, पनवेलमध्येही खरेदीसाठी बाजार गर्दीने फुलून गेला होता. पनवेलमध्ये भाजी मार्केट, बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक, बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी काेराेनाचे नियम मोडत नागरिक खरेदी करत हाेते. जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठांत हेच चित्र हाेते. अलिबाग, पेण, राेहा, माणगाव, मुरुड, पनवेल, खाेपाेली, कर्जत, महाड येथील बाजारामध्ये गर्दी झाली हाेती. किराणा माल, मेडिकल दुकाने, पेट्राेलपंप, खाऊचे स्टाॅल या ठिकाणी विशेष गर्दी दिसून आली.
रांगेत झाली भांडणे
या साऱ्या धडपडीत कोणालाही अंतर नियमांचे भान नव्हते. कांजूरमार्ग, चांदिवली, मुलुंडमधील डी-मार्टबाहेर रांगेत घुसखोरीवरून कडाक्याची भांडणे झाल्याचे प्रकारही निदर्शनास आले.