महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू होणार?; गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:44 PM2020-02-17T20:44:26+5:302020-02-17T20:58:49+5:30

प्रत्यक्ष आंध्र प्रदेशला जाऊन तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे

Maharashtra Home Minister will visit Andhra Pradesh with senior officials to get information on the 'Disha' Act | महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू होणार?; गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशला जाणार

महाराष्ट्रात 'दिशा' कायदा लागू होणार?; गृहमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आंध्र प्रदेशला जाणार

Next

मुंबई - महिलांवरील अत्याचारांविषयी राज्य सरकार संवेदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदेशने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आपण स्वतः गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आंध्र  प्रदेशला जाणार आहोत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला 'दिशा' कायदा प्रभावी ठरेल अशी माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष आंध्र प्रदेशला जाऊन तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे असं अनिल देशमुखांनी सांगितले. 

या दौऱ्यात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे हे सोबत असणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेल्या महिला अत्याचारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विरोधकांनीही राज्य सरकारला या मुद्द्यावरुन कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारने भविष्यात अशाप्रकारे कडक कायदा नक्कीच आणावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांची आहे. 
 

 

Web Title: Maharashtra Home Minister will visit Andhra Pradesh with senior officials to get information on the 'Disha' Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.