Join us  

आता हॉटेल्सचं बिल शेतकरी भरणार का? अभिनेता सुमित राघवनचा 'मविआ' नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 5:43 PM

राज्यात घडणाऱ्या या सत्तानाट्यामध्ये या हॉटेलवर किती खर्च करण्यात आला याबाबत आता टीका होऊ लागली आहे. 

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने आमदार फुटू नये यासाठी शहरातल्या विविध हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलं होतं. पंचतारांकित हॉटेलला या आमदारांचा मुक्काम गेल्या महिनाभरापासून सुरु होता. कोणत्याही परिस्थितीत आमदार फुटू नये याची खबरदारी तिन्ही पक्षांकडून घेतली जात होती. त्यामुळे मग आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? कदाचित शेतकरी असं ट्विट करत अभिनेता सुमिन राघवन याने टोला लगावला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या, मात्र मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. मात्र या सर्व घडामोडीत शिवसेनेला आमदार फुटू नये याची भीती असल्याने त्यांना सुरुवातील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर या आमदारांना मालाड येथील द रिट्रीट हॉटेलला हलविण्यात आलं. 

भाजपाकडून कोणत्याही आमदारांना आमिष दाखविण्यात येऊ नये, संपर्क साधता येऊ नये यासाठी या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. शिवसेनेसोबत काँग्रेसनेही सुरुवातीला आपले आमदार जयपूरला हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर मुंबईतील जुहू येथील जे. डब्ल्यू मेरिट या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम हलविण्यात आला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले अजित पवार यांनी रातोरात केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे 5-6 आमदार बेपत्ता झाले, त्यामुळे राष्ट्रवादीनेही खबरदारी म्हणून आपले आमदार पवई येथील रेनिसन्स हॉटेलला ठेवले होते. 

तसेच महाविकास आघाडीकडे बहुमताचा आकडा असल्याचं दाखविण्यासाठी ग्रँड हयात या हॉटेलला तिन्ही पक्षाचे आमदार एकत्र आणले, आम्ही 162 या कार्यक्रमात आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रँड हयात, ट्रायडेंट, जे. डब्ल्यू मेरिट, रेनिसन्स अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये या गेल्या महिनाभरापासून ठेवण्यात आले. राज्यात घडणाऱ्या या सत्तानाट्यामध्ये या हॉटेलवर किती खर्च करण्यात आला याबाबत आता टीका होऊ लागली आहे. अभिनेता सुमित राघवन याने यापूर्वीही आरेतील झाडे तोडून होणाऱ्या मेट्रो कारशेड बनविण्याचं समर्थन केलं होतं. त्यावेळीही अनेकांनी सुमित राघवन याच्यावर टीका केली होती.  

 

टॅग्स :सुमीत राघवनहॉटेलआमदारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाकाँग्रेस