Join us

Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 19:57 IST

महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं असं शरद पवारांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात भाजपा सरकार कोसळल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला तीन पक्षाच्या या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी असं नाव देण्यात आलं. ही आघाडी देशाला नवी दिशा देईल असा ठराव मांडण्यात आला. त्याला राजू शेट्टी, अबू आझमी, बच्चू कडू, कपिल पाटील यांचं अनुमोदन दिलं. या विकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं असा ठराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला. शरद पवारांच्या आदेशाने हे नावं सूचित करण्यात आलं. 

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सगळ्यात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो. गेल्या काही दिवसांत जे घडलं ते जनतेने पाहायला मिळाला. महाराष्ट्राचा निकाल लागल्यावर ५६, ५४, ४४ अशा गणिताची आकडेमोड सोशल मीडियात झाली. इतका वेळ का लागला, कधी सरकार होणार हे बोललं जात होतं. सगळ्यांच्या मनात विचारांचे काहूर असायचं पण नेतृत्व कोण करणार याबाबत शरद पवारांनी ठरविले होतं. उद्धव ठाकरेंना मी वैयक्तिक कधीच भेटलो नव्हतो, पहिल्यांदा भेटलो तेव्हा कळालं ही व्यक्ती साधी आहे, सरळ आहे. हे सरकार किती वेळ टीकेल असं बोललं जातं पण किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ गेला. ही आघाडी ५ वर्ष नाही तर १५ वर्ष टीकेल असा विश्वास आहे. 

तसेच उद्धव ठाकरेंना आदेशवजा सूचना दिली. महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं असं शरद पवारांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या आघाडीचं नेतृत्व करतील असा ठराव जयंत पाटील यांनी मांडला, या ठरावाला अनुमोदक म्हणून काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी दिलं. 

यामध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले. किमान समान कार्यक्रमातंर्गत झालेल्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. शेतकरी, महिला, प्रादेशिक प्रश्न अशा विविध मुद्द्यावर ही महाराष्ट्र विकास आघाडी काम करेल असं ठरविण्यात आलं आहे. 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेजयंत पाटीलबाळासाहेब थोरातमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019