Join us  

Maharashtra Government: महिनाभराच्या सत्तासंघर्षात हॉटेल मुक्कामी असणारे आमदार आज घरी परतणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 8:42 AM

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांचा हॉटेल मुक्काम संपणार आहे.

मुंबई - गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने आमदार फुटू नये याची विशेष खबरदारी घेतली होती. या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर शनिवारी बहुमत चाचणी सिद्ध झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांचा हॉटेल मुक्काम संपणार आहे. शनिवारी बहुमत चाचणी पास झाल्यावर आमदारांना सोडण्यात येईल असं वाटतं होतं. पण त्यानंतरही आमदारांना विधानभवनातून थेट हॉटेलवर नेण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर या आमदारांना त्यांच्या घरी जाता येणार आहे. 

शनिवारी बहुमत सिद्ध झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या अग्निपरीक्षेचा आज दुसरा दिवस आहे. रविवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले तर भाजपाकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र कथोरे त्यांची उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी एकाचेही सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा अथवा विधान परिषद याचं सदस्य बनणे बंधनकारक आहे. शिवसेनेच्या सूत्रांनुसार विधान परिषदेतून उद्धव ठाकरे निवडून येतील. शिवसेनेचे तानाजी सावंत विधानसभेत निवडून आल्याने शिवसेनेच्या कोट्यातील परिषदेतील एक जागा शिल्लक आहे. उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरु आहे. माहीममधून शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्यांदा जिंकले आहेत. माहीम-दादर शिवसेनेचा गड मानला जातो. २००९ चा अपवाद वगळता याठिकाणी बहुतांशवेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. दुसरीकडे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून उद्धव ठाकरेंनी निवडून यावं अशीही मागणी पुढे येते.   

हॉटेलमध्ये आमदारांचा दिवस कसा होता?महिनाभरापासून हॉटेलच्या मुक्काम असणाऱ्या एका आमदाराने सांगितले की, दिवसभर एकाच ठिकाणी राहून आमचा वेळ लवकर निघत नव्हता. पत्ते, टीव्ही पाहणे, मोबाईलचा आधार घेऊन दिवस ढकलण्याचं काम होत होतं. त्याचसोबत जीम, स्विमिंग याचा आनंदही घेता येत होता.  

टॅग्स :आमदारशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019