Join us  

Maharashtra Government: 'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 10:23 AM

विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपाला मिळून सरकार स्थापन करण्यात अपयश आलेलं आहे. 

मुंबईः विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही सेना-भाजपाला मिळून सरकार स्थापन करण्यात अपयश आलेलं आहे. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद विकोपाला गेल्यानं एनडीएतूनही शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कोणीही सरकार स्थापन करू न शकल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे सेना-भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा संबंध स्थिरस्थावर होण्याची सुतराम शक्यता नाही. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी एका मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रानं दिली आहे.भाजपानं शिवसेनेला अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिलेला असल्याचं त्या वृत्तपत्रानं म्हटलं होतं. त्यासंदर्भात संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले, भाजपाकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, मुख्यमंत्रिपद काय आता इंद्रप्रस्थ दिलं तरी माघार घेणार नाही. संजय राऊतांच्या विधानामुळे भाजपाकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.5 वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असून, येत्या 2 दिवसांत अंतिम निर्णय होणार असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे. महाआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरकार स्थापण्यासंदर्भात चर्चाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे.परंतु मंत्रिपदांच्या वाटपावर अद्याप स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. लवकरच शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक होणार असून, तिन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते. 

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019काँग्रेससंजय राऊत