Join us  

'अजित दादा, we love you', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:15 PM

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली

मुंबई : भाजपासोबत हातमिळवणी करणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले आहे. 

अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. 'अजित दादा, we love you' असे पोस्टर झळकवत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मुंबईत ट्रायडंट हॉटेलबाहेर 'एकच वादा अजित दादा'च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच, अजित पवार राष्ट्रवादीतच होते, आहेत आणि राहणार असेही या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी या तिन्ही पक्षांची आज ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार यांनी गेल्या शनिवारी राज्यात मोठाच राजकीय भूकंप घडवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी, आपले काका शरद पवार यांच्याशी बंड पुकारत त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. 

अत्यंत घाईघाईत हा शपथविधी उरकण्यात आला होता. त्यानंतर पुढचे दोन दिवस राजकारणात अक्षरशः भागम् भाग सुरू होती. एकीकडे, अजित पवार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते, पवार कुटुंब फुटू नये यादृष्टीने हालचाली सुरू होत्या, तर दुसरीकडे राज्यातील शपथविधीविरोधात, भाजपाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकार