Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; योग्य वेळी योग्य निर्णय घेणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 2:31 PM

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढत चालला आहे. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. त्याचसोबत या बैठकीत शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र उभे करा अशा सूचना जिल्हाप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. 

या बैठकीनंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेऊन आहेत. जो काही निर्णय होईल त्या पाठिशी आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत. आमदार निवासाचं काम सुरु असल्याने मुंबई बाहेरील आमदार रंगशारदाला थांबले आहेत. रंगशारदामध्ये जेवढ्या खोल्या आहेत त्या कमी पडत असतील तर दुसरीकडे व्यवस्था होऊ शकते असं त्यांनी सांगितले. 

दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे मुंबईत दाखल झालेले आहेत. शिवसेना-भाजपा युतीमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न गडकरी करणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद सोडणार नाही अशी भाजपाची भूमिका आहे. मात्र गडकरी मातोश्रीवर येणार असतील तर त्यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देणार असं लिखित पत्र लिहून आणावं असं सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झाले आहेत. 

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ३ वेळा फोन केला. मात्र हे फोन उचलले गेले नाहीत असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदावर शिवसेना ठाम आहे. मात्र दिवाळी फराळाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अनपौचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्रिपदाबाबत युतीच्या बैठकीत काहीही ठरलं नव्हतं असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. 

जे बैठकीत ठरलं होतं तेच मी मागत होतो. मात्र मला खोटं पाडणार असाल तर ते सहन करणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. तत्पूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फार काळ राहावं असा डावपेच महाराष्ट्रात सुरु आहे. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नये, बहुमत असेल तर सिद्ध करा, घटनेनुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेमुख्यमंत्री