मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिढा वाढलेला आहे. केंद्र सरकारमधून शिवसेना मंत्र्याने राजीनामा दिल्याने पक्ष आणखी आक्रमक झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सरकार बनविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचसोबत विविध माध्यमातून भाजपावर जोरदार टीका सुरुच आहे.
सत्तास्थापनेच्या हालचाली दिल्लीत सुरु आहेत. मात्र तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी २२ नोव्हेंबरला मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत येताना ओळखपत्रासह ५ दिवसांचे कपडेही सोबत आणण्यास सांगितलं आहे. मात्र याचा धागा पकडत नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केले आहेत.
निलेश राणेंनी ट्विट करुन लिहिलं आहे की, शिवसेना आमदारांना ५ दिवसाचे कपडे व आधार कार्ड आणायला सांगितलं आहे. अशी वागणूक आपण नोकरांना देखील देत नाही. शिवसेना आमदार हे स्व. बाळासाहेबांच्या नावावर व स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत उद्धव ठाकरेंच्या नाही. आधी तिकीट मिळवायला पैसे द्या आणि जिंकल्यावर यांची भांडी पण घासा अशा शब्दात निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेसोबत राणेंचे वैर झालं आहे. नारायण राणे यांना भाजपा घेण्यास शिवसेनेने विरोध केला होता. पण भाजपानेही नारायण राणेंना राज्यसभेचे खासदारकी देऊन एकप्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली मात्र कणकवली मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंत यांना तिकीट दिलं. मात्र नितेश राणेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुन पुन्हा मतदारसंघात विजय मिळविला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची आणि एनडीएची बैठक नाकारायची. संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे आहेत. जे सगळे ठीक असले तरीही सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालत बसतात, अशी टीका करण्यात आली होती.