शिवाजी पार्कवर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 05:43 AM2019-11-29T05:43:02+5:302019-11-29T05:43:34+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सजूनधजून आलेल्या शिवसैनिकांनी शिवाजी पार्कचा परिसर फुलला होता.

Maharashtra Election, Maharashtra Government: Shout out at the Shivaji Park | शिवाजी पार्कवर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

शिवाजी पार्कवर महाआघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

googlenewsNext

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सजूनधजून आलेल्या शिवसैनिकांनी शिवाजी पार्कचा परिसर फुलला होता. एकीकडे सरकार बनत असल्याचा उत्साह, झिंदाबादच्या घोषणा, सेल्फी आणि राजकीय शेरेबाजीने वातावरण भरून गेले होते.

बुधवारी सायंकाळपासूनच शपथविधीसाठी शिवाजी पार्कसह दादर परिसरात तयारी सुरू होती. शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर शिवसेनेचे भगवे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या होत्या. तर, अधूनमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिरंगाही सोबत करत होता. सायंकाळी पाचनंतर शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. घोळक्याने येणारे शिवसैनिक झिंदाबादच्या घोषणा देत होते. महाआघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि महिला शिवसैनिकांची गर्दी लक्षणीय होती.

राजकीय शेरेबाजी
शपथविधी सोहळ्या दरम्यान उपस्थित प्रेक्षकांच्या राजकीय शेरेबाजीला बहार आली होती. महिनाभर सुरू असलेल्या राजकीय कसरतीला साजेशा टोलेबाजीनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकत होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हुर्यो उडविण्याचा प्रयत्न यावेळी झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही यातून सुटले नाहीत. या वेळी जाणत्या कार्यकर्त्यांनी ते आपले पाहुणे असल्याची आठवण करू देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार, संजय राऊत आणि राज ठाकरेंसाठी टाळ्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगमनाला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. एलईडी स्क्रीनवर जेव्हा जेव्हा हे नेते दिसायचे तेव्हा तेव्हा घोषणाबाजी होत होती.

पवार झिंदाबादचे फलक
शिवाजी पार्कात सर्वाधिक गर्दी केली ती शिवसैनिकांनी. पाठोपाठ मुंबई काँग्रेसचा एक गटही होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र तुलनेने कमी होते. मात्र, शरद पवार झिंदाबाद; पवार इज पॉवर असे फलक हाती घेऊन काही कार्यकर्त्यांचा जत्था शिवाजी पार्क परिसरात हिंडत होता. येणारे नेते आणि माध्यमांच्या कॅमेºयासमोर हे कार्यकर्ते आवर्जून येत.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shout out at the Shivaji Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.