हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:47 AM2019-11-27T06:47:05+5:302019-11-27T06:47:20+5:30

राज्यातील सत्तापेचामध्ये आमदार फुटू नयेत, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sainik guarded the MLAs at Hotel Lemon Tree | हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा

हॉटेल लेमन ट्रीमधील आमदारांवर शिवसैनिकांचा होता खडा पहारा

Next

मुंबई : राज्यातील सत्तापेचामध्ये आमदार फुटू नयेत, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. शिवसेनेच्या आमदारांना मरोळजवळील लेमन ट्री मध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवसैनिक, युवसेनेचे कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. या हॉटेल परिसरात कोणताही दगाफटका होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यांचा खडा पहारा हॉटेलमध्ये व परिसरात होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत सिद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर वातावरणातील तणाव काहीसा निवळला.

काही वेळानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा आल्याचे वृत्त येताच शिवसेनेच्या आमदार, पदाधिकारी व शिवसैनिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर उपस्थितांनी जल्लोष केला. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आमदार तिथून निघाले व पोलिसांनादेखील हायसे वाटले.

विमानतळावर नेते, वकिलांचे भाकासेतर्फे स्वागत

अजित पवार व त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त धडकताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल निकाल येताच सर्वांचे चेहरे उजळले. भारतीय कामगार सेना व शिवसैनिकांतर्फे मुंबई विमानतळावर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी बाजू मांडणारे वकील व शिवसेनेचे नेते अनिल परब, अनिल देसाई यांच्यासह नेत्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम, संतोष कदम व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sainik guarded the MLAs at Hotel Lemon Tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.