Join us  

Maharashtra Government : राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही; 'राजभवन'ने वृत्त फेटाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 2:47 PM

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 18 दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही.

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र याबाबतचे वृत्त राजभवनाकडून फेटाळण्यात आले आहे. राजभवन प्रवक्त्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 18 दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला निमंत्रण पाठविले पण या तिन्ही पक्षांना सरकार बनविण्यात अपयश येत असल्याचं लक्षात घेऊन राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली आहे अशा संदर्भात इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी बातमी दिली होती. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का? असं सावंत यांनी म्हटलं आहे. 

'राज्यपाल हे #भाजपाचे बाहुले आहेत का? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल' असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. सावंत यांनी मंगळवारी (12 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हे ट्वीट केले आहे. याधीही काही दिवसांपूर्वी राज्यपाल सत्तास्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे राज्यपाल कोणाच्या दबावाखाली कामकाज करीत आहेत काय असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला होता. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते अन् ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा वाद सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान ब्राझील दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यामुळे या बैठकीला राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला मान्यता मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाकडून अशी कोणतीही शिफारस केली नसल्याचा सांगून या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा