Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 12:17 IST

शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. महाशिवआघाडीच्या माध्यमातून किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आला असून लवकरच राज्यात नवीन सरकार येईल असा दावा करण्यात येत आहे. मात्र या सर्व घडामोडींवर वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेणाऱ्या भाजपाने शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपावर एकतर्फी टीकेचा कार्यक्रम सुरु होता. मात्र आता अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेविरोधात टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  जे 'मातोश्री'वरुन कुणी कुटुंबातील व्यक्ती म्हणून राज ठाकरेंना भेटायला जात नव्हते, मात्र आता माणिकराव ठाकरेंनाही भेटण्यासाठी, सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलमध्ये जात आहेत असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय, संजय राऊतांनी मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. अमित शाह आणि मोदीजी संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल असा टोला शेलारांनी संजय राऊतांना लगावला आहे. 

तसेच संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, यासाठी शुभेच्छा आहेत. सत्य सांगितल्यामुळे काही लोकांची अडचण झाली आहे. बाळासाहेबांच्या आदरापोटी नेते मातोश्रीवर जायचे, राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणं हे अमान्य आहे. भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. 90 हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील हे आज आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील. 

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी व मी जाहीर भाषणातून केली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. आम्हाला मोदी आदरणीय आहेत आणि नेहमी राहतील. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र, आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा वारंवार उल्लेख केला. त्यावेळी भाजपने का आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा राऊत यांनी केली. 

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019