Join us  

Maharashtra CM: सारखं-सारखं काय विचारता? मुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 11:19 AM

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ ज्या मुख्यमंत्रिपदावरुन झाला. याच पदासाठी भाजपाने शिवसेनेला अपमानित केलं. मुख्यमंत्रिपद न सोडल्याने शिवसेना नाराज झाली. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अधिकृत प्रस्ताव पाठविला. किमान समान कार्यक्रम यावर तिन्ही प्रमुख पक्षाची चर्चा सुरु आहे. वारंवार जो प्रश्न विचारला जातो मुख्यमंत्रिपदाचा, निश्चितच शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाशिवआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला असून, सत्तावाटपाचाही फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे निश्चित झाले आहे. तसेच मंत्रिपदांच्या वाटपाबाबतचेही धोरण निश्चित झाले आहे. त्यानुसार शिवसेना आणि  राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 14 तर काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील. 

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारामध्ये हिंदुत्वाचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी आणि तरुणांशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती आहे. 

दरम्यान, विभिन्न विचारधारा काय असते? किमान समान कार्यक्रम राज्याच्या हितासाठीच आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींनी पहिलं सरकार विविध विचारधारेची माणसं येऊन बनलं होतं. शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात यापूर्वीही किमान समान कार्यक्रम ठरवून विभिन्न विचारधारेची लोकांना एकत्र येत सरकार बनविले होतं. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे असं सांगत संजय राऊतांनी देशात असं सरकार यापूर्वीही बनलं आहे अशी आठवण करुन दिली.  

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनामुख्यमंत्रीभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019