Join us

Maharashtra CM: अजित पवारांना ईडीची भीती की महत्त्वाकांक्षा? बंड यशस्वी होणार की फसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 05:00 IST

अजित पवार यांनी ईडीची भीती आणि सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार यामुळेच बंडखोरी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : अजित पवार यांनी ईडीची भीती आणि सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार यामुळेच बंडखोरी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.अजित पवार यांची आजवरची राजकीय वाटचाल ही चढत्याक्रमाने झाली असली तरी त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी १९८२ साली पहिल्यांदा राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर ते १९९१ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाली आणि सलग सोळा वर्षे ते या बँकेचे चेअरमन राहिले आहेत. शरद पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९५ ते २०१९ पर्यंत सलग पंचवीस वर्षे आमदार म्हणून बारामतीमधून निवडून आले आहेत.सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा समावेश झाला. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा, सिंचन, गृह, जलसंधारण या सारखी महत्वाची खाती सांभाळली आहेत. आघाडी सरकारमध्ये अनेक प्रयत्नानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले होते. त्याअगोदर विजयसिंह मोहिते आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते नाराज झाले होते. आताही शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू असताना आपणांस अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे, यासाठी ते आग्रही होते. त्यांची ती मागणी मान्य न झाल्यामुळेच ते नाराज झाले असावेत.कारवाईची टागंती तलवार : कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. या घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदा मंत्री म्हणून अजित पवार यांच्यावरही आरोप आहेत. तसेच राज्य शिखर बँकेतील घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना नोटीस बजावली आहे. शिवाय, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. या कारवायांमुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्रराजकारणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019