Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'होय, आमचं पवारांशी बोलणं झालं; मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 10:26 IST

दिल्लीत काय झालं याची माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं आम्हाला पडलं नाही. राजकारणात चर्चा होत असते. अनेकदा बोलण्यातून अनेक गोष्टी घडत असतात.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबत तिढा वाढत चालला असून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं ठामपणे सांगितले आहे. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं ही शिवसेनेची भूमिका आहे. लवकरच उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात स्थिर सरकार यावं ही सगळ्यांची भूमिका आहे. राज्यपालांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. काय होऊ शकते शिवसेनेची भूमिका काय याची माहिती राज्यपालांना दिली. अपक्षांची भूमिका महत्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. शरद पवार देशाचे मोठे नेते, ते मुख्यमंत्री होतील ही अफवा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दिल्लीत काय झालं याची माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं आम्हाला पडलं नाही. राजकारणात चर्चा होत असते. अनेकदा बोलण्यातून अनेक गोष्टी घडत असतात. शिवसेनेने प्रस्ताव पाठविला नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने वेट अँन्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची माझं बोलणं झालं. शरद पवारांना भेटलो, बोललो तर गुन्हा आहे का? ज्यांना पवारांशी बोलण्याचा पोटशुळ उठला आहे. तेदेखील त्यांच्याशी कसा संपर्क साधतात हे आम्हाला माहित नाही. मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण होऊन महाराष्ट्रातील ग्रहण सुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचा राजकीय चेहरा बदलेल हे दिसेल. न्याय आणि अधिकारासाठी सत्याची लढाई आहे. विजय आमचा होईल. महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री होईल जे पाहून जनता नक्कीच बोलेल महाराष्ट्राचा चेहरा बदलला असं सांगत तरुण भारतच्या अग्रलेखावर राऊतांनी निशाणा साधला आहे. टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच, मी माझ्या पक्षाची भूमिका समोर मांडतो, पक्षाच्या हक्कासाठी मी संघर्ष करतोय, दिलेला शब्द का पाळला जात नाही त्यावर कोणी बोलत नाही. जे सत्य आहे, कोण खोटं बोलतंय याची कल्पना सगळ्यांना आहे यावर कोणी बोलत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.  

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतभाजपामुख्यमंत्री