Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: सत्ता संघर्षात शिवसेना देणार भाजपाला मात? मदतीसाठी पुढे येणार अदृश्य 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 8:47 AM

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मागणीवर आजही शिवसेना ठाम आहे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा पुढील काही तासात सुटणार आहे. मात्र अद्यापही भाजपा-शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावरचा पेच कायम आहे. अशातच जर शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून राहिली तर भाजपाला स्वबळावरही सत्ता स्थापन करता येणार नाही. भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा निकालात मिळाल्या आहेत. तर अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. 

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल या मागणीवर आजही शिवसेना ठाम आहे. महायुतीचं सरकार येणार असं असलं तरी भाजपा नेते म्हणत असले तरी ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे महायुती कुणाची अन् कशी असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. सत्ता स्थापनेच्या या गणितामध्ये शिवसेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक मातोश्रीवर पार पडत आहे. या बैठकीनंतर आमदारांचा कुणाचीही संपर्क होऊ नये यासाठी त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेना राज्यात मुख्यमंत्री बसवेल का? यावर चर्चा होऊ लागली. या दरम्यान, संजय राऊत दोनदा शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजपावर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधकांनीही शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना ५६ आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री बनविणार असल्याचा दावा करत आहे. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला कोणाची साथ मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सरकार बनवू शकते पण त्यासाठी काँग्रेसची मदत लागणार आहे. 

काँग्रेसमधील काही नेते भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी करत आहेत. अशातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतरही काँग्रेसची भूमिका स्पष्ट नसली तरी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दिला तर त्याचा फटका इतर राज्यात काँग्रेसला बसू शकतो असा मतप्रवाह समोर येत आहे त्यामुळे काँग्रेस नेमकी सत्तेचं गणित कसं जमविणार याबाबत शंका आहे. 

मात्र राजकीय वर्तुळात अशीही एक चर्चा आहे की, काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी एक गट शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देईल. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल अन् काँग्रेसला याचा फटकाही बसणार नाही असा दुहेरी फायदा होऊ शकतो असं सांगण्यात येतं. पण हे कितपत शक्य होईल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे पुढील काही तास राज्यात सत्तास्थापनेसाठी वेगवाग घडामोडी घडताना पाहायला मिळतील.  

महत्वाच्या बातम्या

सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, अन्यथा...

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह; काय असणार सत्तेचं गणित? 

वेगवान राजकीय हालचाली, भाजपचा पुन्हा एकदा 'प्लॅन बी'

राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

शरद पवारांनी राखून ठेवला ‘पत्ता’! शिवसेनेच्या पाठिंब्यावर ‘ब्र’ नाही; पण काँग्रेसशी पुन्हा चर्चा करणार

 

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा