Maharashtra Election 2019: कुठे काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:53 AM2019-10-22T04:53:02+5:302019-10-22T06:13:48+5:30

Maharashtra Election 2019: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली.

Maharashtra Election 2019: What happened? | Maharashtra Election 2019: कुठे काय घडले?

Maharashtra Election 2019: कुठे काय घडले?

Next

जळगाव : शिवसेना मंत्र्याच्या मुलासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील व भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे कार्यकर्ते १८ आॅक्टोबरला मध्यरात्री भिडले होते. या प्रकरणी मंत्री पुत्र तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर शिवसेनेच्या तक्रारीवरून किशोर झवर व नितेश पाटील यांच्याविरुद्ध पाळधी पोलिसांत दुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर : जामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोघे जखमी

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.

गडचिरोली : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना प्रकृती बिघडून शिक्षकाचा मृत्यू

एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी या अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावर पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने शिक्षक बापू पांडू गावडे (४५ वर्षे) यांचे निधन झाले. गावडे हे बेस कॅम्पवरून रविवारी इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस संरक्षणात मतदान केंद्राकडे जात होते. त्यांना फिट येऊन ते खाली कोसळले. एटापल्ली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. रविवारी मध्यरात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

ठाणे :ईव्हीएमवर शाई फेकणाºयास अटक

भिवंडी पूर्व मतदारसंघात मनसेचे उमेदवार मनोज गुळवी यांची गाडी अनोळखी व्यक्तींनी रविवारी रात्री फोडली. तर ठाणे शहर मतदारसंघात बहुजन नेते सुनील खांबे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएमचा निषेध करून घोषणा देत मशिनवर शाई फेकली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोलापूर : उमेदवारांचे समर्थक भिडले

माढा तालुक्यातील दहिवली येथे दुपारी दीड वाजता अपक्ष उमेदवार नारायण पाटील आणि संजय शिंदे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. काही काळ मतदानावर परिणाम झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद : भाजप नेत्याचे मोबाइल दुकान फोडले

औरंगाबादला भाजप पदाधिकारी मयूर चोरडिया यांचे जय भवानी चौकातील मोबाईल दुकान सोमवारी फोडले. रवी उर्फ दीपक काळे याने दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर लाईव्ह येऊन त्याबाबत धमकी दिली होती. घटनेची माहिती मिळताच डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल रोडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यासंदर्भात संतोष चोरडिया यांनी संबंधित कार्यकर्त्या हा शिवसेनेचे उपरणे डोक्याला बांधून आला होता त्यामुळे हा पूर्वनियोजीत कट असून याचे मुख्यसूत्रधार कोण आहेत याची माहिती पोलिसांनी घ्यावी असे लोकमतशी बोलताना सांगितले.

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारावर गोळीबार केल्याची तक्रार

मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबार करण्यात आल्याची तक्रार शेंदूरजनाघाट पोलिसांत चालकामार्फत देण्यात आली. मलकापूर ते मालखेड मागार्ने काढलेल्या चारचाकीला अन्य एक चारचाकी आडवी झाली. त्यातून उतरलेल्या सहा जणांनीभुयार यांच्या बाजूने तीन फायर केल्याचा आवाज झाल्याचे चालकाने तक्रारीत नमूद केले. अज्ञात इसमांनी भुयार यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे चारचाकी वाहन पेटविले. जखमी झालेल्या भुयार यांना शेंदूरजना घाट पोलिसांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोळीबाराचे कुठलेही पुरावे घटनास्थळी आढळले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सांगितले.

धुळे : पैसे वाटपाची आमदार गोटे यांची तक्रार

देवपूर भागात शनि मंदिर परिसरातून आमदार अनिल गोटे यांनी ५० हजारांची रोकड आणि एक बनावट पिस्तूल पोलिसांना पकडून दिले. मुद्देमाल जप्त करून देवपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती डीवायएसपी सचिन हिरे यांनी दिली. त्याठिकाणी पैसे वाटप सुरू होते. पोलीस वेळेवर आले नसते तर त्यांनी माझ्यावर गोळी झाडली असती, असा आरोप गोटे यांनी केला. न्यू सिटी हायस्कूल येथील मतदान केंद्रात मोबाईलवर ईव्हीएम मशिनसह फोटो काढून स्वत:च्या व्हाटस् अपच्या स्टेटसला ठेवल्याप्रकरणी हर्षल या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

यवतमाळ : आजी-माजी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, दिग्रसला तणाव

दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि भाजप बंडखोर व माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारी क्षुल्लक बाबीवरून वाद झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटविला. कमान गेट भागात एका उमेदवाराचे समर्थक पैसे वाटप करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून दुसºया उमेदवाराचे शंभरावर कार्यकर्ते त्या समर्थकाच्या घरावर चालून गेले. त्याला शिवीगाळ केली, त्यांनी पोलिसांना पाचारण केले. कार्यकर्तेही तेथे पोहोचले. त्यांच्यात शिवीगाळ व वादावादी झाली. त्यातूनच शाब्दीक चकमक व दोन्ही गटांत मारहाण झाली. कुणीही पोलिसांत तक्रार नोंदविलेली नाही, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी दिली.

अहमदनगर : श्रीगोंद्यात पैसे वाटणारे ताब्यात

मतदान केंद्रात मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी येथे गुन्हा दाखल झाला आहे. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यातील कांबळेश्वर (ता. बारामती) येथील मतदान केंद्राच्या समोर मतदारांना जाण्या-येण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.

Web Title: Maharashtra Election 2019: What happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.