Join us  

हम होंगे कामयाब! रुग्णालयातून संजय राऊतांनी शिवसेनेला दाखविला सत्तेसाठी आशेचा किरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 9:39 AM

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक असल्याने लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक असल्याने लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदावर आक्रमक असलेल्या शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ठामपणे मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर होती. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत होते. मात्र ऐन सत्तास्थापनेच्या घडामोडीत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यामुळे आता शिवसेनेची बाजू कोण मांडणार हा प्रश्न पक्षासमोर होता. मात्र संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे रुग्णालयातून ट्विट करत अजूनही आम्ही आशा सोडली नाही असा विश्वास शिवसैनिकांना दिला आहे. 

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलंय की, "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' हम होंगे कामयाब, जरूर होंगे अशा शब्दात राऊतांनी हॉस्पिटलमधून शिवसेनेचा आत्मविश्वास कायम ठेवला आहे. 

सोमवारी महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीकडे लागले होते. मात्र सांयकाळपर्यंत काँग्रेसचा निर्णयच होऊ शकला नाही; त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला दिलेच नाही.सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला ७२ तासांचा वेळ दिला होता. मात्र शिवसेनेला फक्त २४ तासांचा अवधी दिला. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने त्यांनी वेळ वाढवून मागितला; पण राज्यपालांनी तो दिला नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे मुदत संपल्यामुळे शिवसेना पाठिंब्याचे पत्र देऊ न शकल्याने त्यांची कोंडी झाली. अशातच राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याने अजूनही राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येण्याची संधी हुकली नसल्याची आशा शिवसेनेला आहे.  

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा