Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 06:36 IST2019-10-11T06:17:29+5:302019-10-11T06:36:57+5:30
शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती.

Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे
मुंबई : सत्ताधाऱ्यांना जाब विचारणा-या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाºया व समस्यांवर आवाज उठवणाºया सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथे पहिल्या जाहीर सभेत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कधी उमेदवार आयात करण्याची वेळ आली नव्हती, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.
शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. यावर राजीनामा देण्याची फक्त घोषणा केली, अशी टीका गोरेगावच्या सभेत करताना ‘आमची वर्षे युतीत सडली आणि १२४ जागांवर अडली,’ अशी टपलीही राज यांनी मारली.
ईडीच्या चौकशीमुळे माझे थोबाड बंद होणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला. सत्ता आवाक्यात असेल तेव्हा सत्तेसाठी मते मागेन. मात्र सध्या माझा आवाका मला माहीत असल्याने प्रबळ विरोधी पक्षासाठी मतदान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही भूमिका देशात कोणत्याही राजकीय पक्षाने घेतली नाही. मात्र आम्ही घेत आहोत. कारण विरोधी पक्षाचा आमदार सत्ताधाऱ्यांना नामोहरम करू शकतो, असे स्पष्टीकरण राज यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल दिले. राज्यातील विधानसभा प्रचाराची पहिली जाहीर सभा वांद्रे पूर्व विधानसभेतील सांताक्रुझ पूर्व येथील मराठा कॉलनीमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आली होती.
सरकारला धारेवर धरणाºया व प्रश्न विचारणाºया विरोधी पक्षांची गरज सध्या आहे. रोजगार हिरावला जात आहे, रोजगार मिळत नाही. अशा वेळी जनता प्रश्न विचारणार नाही, तर कधी विचारणार, असा सवाल त्यांनी केला. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, तरुण सर्व वर्ग नाराज आहे. मात्र त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या नाराजीची दखल घ्यायला लावण्याची गरज आहे. कुणीही न्यायालयात जाऊन आमच्या सणांवर बंदी घालतात. तुम्ही शांत बसता त्यामुळे हे प्रकार होतात. मनसेने या प्रत्येक वेळी आवाज उठवला आहे. माझ्या उमेदवारांमध्ये प्रश्न विचारण्याची आग आहे. खंबीर विरोधी पक्ष असेल तरच न्याय मिळेल, सरकारकडून न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले. न्यायालयाकडून न्याय मिळणार आहे की नाही माहीत नाही. सरकार व न्यायालय संगनमताने चालल्यास तुमचा राग कोण व्यक्त करेल, असा प्रश्न राज यांनी विचारला.
पुण्यात नव्हे तर पाण्यात राहतात
शहरांचे नियोजन कोलमडले आहे. शहरांचा विचका झाला आहे. काल पुण्यात अर्धा तास पाऊस पडला तर पुणे पाण्यात गेले. पुणेकरांना ते पुण्यात नव्हेतर पाण्यात राहतात, असे सांगण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपत गेले. विरोधी पक्ष नसल्याने प्रश्न विचारणार कोण व समस्या मांडणार कशा, हा प्रश्न निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सत्ताधारी आमदारांना ब्र काढण्यासदेखील परवानगी नाही. पैसे बुडालेल्या बँकेत भाजपचेच नेते आहेत. महाराष्ट्रासारख्या उद्योगात प्रथम क्रमांकावरील राज्यात उद्योग अधोगतीला जात आहेत, तर इतर राज्यांचे काय सांगायचे?, असे ते म्हणाले. वांद्रे येथील सभेवेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, वांद्रे पूर्वचे उमेदवार अखिल चित्रे उपस्थित होते.
बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केल्याचे सांगून राज म्हणाले, मेट्रोच्या कारशेडसाठी बीपीटीची जागा सुचवली होती. आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात पुढाकारही घेतला होता. जिथून मेट्रो सुरू होत आहे, तिथे कारशेड करा, असे सरकारला सुचविले होते. पण आरेत कारशेड उभारून सरकारला बीपीटीची जागा कोणाच्या घशात घालायची आहे, असा सवालही त्यांनी केली. या आरेत सरकारने २७०० झाडे कापली. न्यायालयेसुद्धा सरकारला पूरक निर्णय देतात. राज्यात पर्यावरणमंत्री शिवसेनेचे आहेत. मात्र, आरेतील झाडांची कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात, ‘सत्ता द्या, आम्ही आरेला जंगल घोषित करू.’ अरे, आम्हाला मूर्ख समजता का? असा सवालही त्यांनी केला.
उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत. बेरोजगारांना काम मिळत नाही; तरीही राज्य थंड आहे. कोणी काही बोलतच नाही. शिवस्मारकाची घोषणा झाली पण कुठे आहे शिवस्मारक, असा प्रश्न करतानाच महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही, तर इतिहासपण आहे. याच इतिहासाला, गडकिल्ल्यांना सरकार लग्नासाठी द्यायला निघाले आहे, तरीही माध्यमे आणि लोक थंडच बसले आहेत. आता परत जाहीरनामे येणार व जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार. तुमच्या मनात राग आहे की नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही, असा प्रश्न करताना तुमच्या मनातला सरकारच्या विरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठीच मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे राज म्हणाले. सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला वाट्टेल तसे चिरडून टाकेल. ते रोखण्यास आम्हाला निवडून यायचे असल्याचे राज म्हणाले.