मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र रुग्णालयात दाखल असतानाही राऊत बेडवर बसून दैनंदिन काम करीत आहेत.बुधवारी सकाळी संजय राऊत यांचा रुग्णालयातील एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ते बेडवर बसून लिखाणकाम करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर गेले काही दिवस सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे राऊत यांनी रुग्णालयात दाखल असून तसेच अँजिओप्लास्टी होऊनही मंगळवारी नेटकऱ्यांची निराशा केली नाही. रुग्णालयात असतानाही त्यांनी ट्विट करत आपण अजूनही राज्यातील घडामोडींवर तितकेच बारीक लक्ष ठेवून असल्याचे दाखवून दिले.ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून महाराष्टÑात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या संघर्षात आम्ही यशस्वी होणार असल्याचे राऊत यांनी म्हटले.दरम्यान, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत रुग्णालयात असूनही काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:02 IST