Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:12 AM2019-10-08T05:12:58+5:302019-10-08T05:15:04+5:30

गुरूदास कामत यांच्या अकाली निधनानंतर मुंबई कॉँग्रेसचे राजकारण मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या दोन नेत्यांभोवती फिरत आहे.

Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam and Milind Deora | Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा

Maharashtra Election 2019 : रुसलेले संजय निरुपम अन् हरवलेले मिलिंद देवरा

Next

- गौरीशंकर घाळे 

मुंबई : गटबाजी, अंतर्गत लाथाळ्यांचा मोठा इतिहास मुंबई काँग्रेसला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आलेल्या गटबाजीचा दुसरा अंक आता विधानसभा निवडणुकीतही सुरू आहे. समर्थकांना डावलल्याचा आरोप करत प्रचारच करणार नसल्याचे संजय निरुपम यांनी अलीकडेच जाहीर केले. तर सामूहिक नेतृत्वाची भलामण करणारे मिलिंद देवरा प्रचारात कुठेच नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे रुसलेले निरुपम आणि हरवलेले देवरा अशी मुंबई काँग्रेसची स्थिती आहे.
गुरूदास कामत यांच्या अकाली निधनानंतर मुंबई कॉँग्रेसचे राजकारण मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या दोन नेत्यांभोवती फिरत आहे. या दोन मुख्य नेत्यांभोवती बाकीचे छोटे-मोठे गट प्रसंगानुरूप एकवटत असतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांच्या बदल्यात संजय निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी मिलिंद देवरा अध्यक्ष झाले. तेव्हापासून संजय निरुपम यांचे एकाकी राजकारण सुरू आहे. तर, लोकसभेच्या निकालानंतर देवरा यांनीही नैतिकतेचा मुद्दा पुढे करत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्षाने सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांना आधी कार्याध्यक्ष आणि पुढे अध्यक्षपदाची धुरा दिली. देवरा यांनी सामूहिक नेतृत्वाची भलामण करत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मात्र पक्षाच्या घडामोडीत ते कुठेच दिसेनासे झाले.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मात्र, निरुपम, देवरा हे मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते कुठेच नाहीत. मुंबईतील ३६ पैकी एकच जागा मागितली, तीसुद्धा नाकारली. राहुल गांधींच्या टीममधील नेत्यांना जाणीवपूर्वक डावलण्याची खेळी काँग्रेसमधील एक गट खेळत आहे, असा आरोप करत निरुपम यांनी विधानसभेचा प्रचार करणार नसल्याची घोषणा केली. तर देवरांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत नाही. नेत्यांचा प्रचार, जाहीरनामे, वॉररूमचे उद्घाटन अशा कोणत्याच कार्यक्रमात ते नाहीत. त्यामुळे देवरा कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



पक्षांतराची दबक्या आवाजात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे गुणगान करणारे टिष्ट्वट मिलिंद देवरा यांच्याकडून नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर देवरा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. काँग्रेससह इतर पक्षांच्या नरजराही यामुळे देवरा यांच्या यासंदर्भातील भूमिकेकडले लागल्या होत्या. स्वत: देवरा यांनी तसे काहीच नसल्याचे टिष्ट्वट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत देवरा कुठेच दिसत नसल्याने पक्षांतराची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाºया देवरांनी निवडणुकीबाबत कसलेच टिष्ट्वट केलेले नाही. देवरांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ‘ते प्रचारात लवकरच सहभागी होतील’ असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. मात्र कधी सहभागी होणार, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.

Web Title: Maharashtra Election 2019: Sanjay Nirupam and Milind Deora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.