अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 04:11 AM2019-10-26T04:11:18+5:302019-10-26T11:52:56+5:30

उपमुख्यमंत्रिपद देण्याची भाजपची तयारी

Maharashtra Election 2019: The oath will be prolonged | अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार?

अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार?

Next

- यदु जोशी

मुंबई : मुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळातही ‘फिफ्टी-फिफ्टी’चा आग्रह शिवसेनेने धरल्याने महायुतीत महातणावाची स्थिती असून त्यावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबेल अशी स्थिती आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘आमचा फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितल्याने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना अडून बसणार असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्रीपद देणार नसाल तर १९९५ च्या युतीच्या फॉर्म्युल्यात भाजपकडे असलेली खाती शिवसेनेला द्यावीत, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती भाजपकडे होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची तयारी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची आपली तयारी आहे, असे निवडणुकीपूर्वीच म्हटलेले होते. आदित्य यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावे की नाही या बाबत शिवसेनेत अद्याप एकवाक्यता होऊ शकलेली नाही. उपमुख्यमंत्री पदाशिवाय महसूल, सार्वजनिक बांधकाम दोन-तीन महत्त्वाची खाती आणि दोनतीन वाढीव मंत्रीपदे देण्याची तयारी भाजपकडून दर्शविली जाऊ शकते. दोन्ही पक्षांमध्ये सत्तावाटपाबाबत लवकरच बैठक होणार आहे.

गरज भासल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील त्यासाठी मुंबईत येऊ शकतात. मात्र, सत्तावाटपाचा तोडगा दिवाळीनंतरच निघेल. त्यामुळे फडणवीस सरकारचा शपथविधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भाजप आमदारांची नेतानिवडीसाठी बैठक होईल आणि त्यात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

महायुतीसाठी जनादेश मिळालेला आहे. त्यामुळे एकमेकांचा सन्मान करणं हे दोघांचेही कर्तव्य आहे. एकत्रित बसून निर्णय करू. चर्चेतून सगळे ठरवू. कोणतीही अडचण येणार नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Maharashtra Election 2019: The oath will be prolonged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.