Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 5:22 PM

चॅनेल्सच्या एक्झिट पोलमधून आलेली आकडेवारी मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी चिंताजनक होती

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा राज्यातील जनतेने कौल दिल्याचं सांगितले आहे. महायुतीला २०० च्या आसपास जागा मिळतील तर आघाडीला ५०-६० जागा मिळण्याचे संकेत आहे. मात्र विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून एक सर्व्हे असा आहे की, राज्यात मनसेला १-५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. पोल डायरी या संस्थेने हा अंदाज वर्तविला आहे. 

चॅनेल्सच्या एक्झिट पोलमधून आलेली आकडेवारी मनसेसाठी आणि राज ठाकरेंसाठी चिंताजनक होती. २०१४ साठी मनसेला राज्यात एकमेव जागा जिंकता आली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. मनसेला एक्झिट पोलमध्ये एकही जागा जिंकता येणार नाही असं काही संस्थांचे म्हणणं आहे. तर पोल डायरीने केलेल्या सर्व्हेमधून भाजपाला १२१-१२८ जागा, शिवसेना- ५५-६४ जागा, काँग्रेस ३९-४६ जागा, राष्ट्रवादी ३५ ते ४२ जागा, वंचित बहुजन आघाडी १-४ जागा तर मनसेला १-५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. 

मनसेला राज्यात विदर्भातील वणी येथे जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वणी येथे राजू उंबरकर हे मनसेचे उमेदवार आहेत. याठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली होती. तर बाळापूर येथील जागा वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते असं सांगण्यात आलं आहे. तर एकूण मतदानाच्या २ टक्के मतदान मनसेचे उमेदवार घेतील असं सांगण्यात आलं आहे. २०१४ च्या मोदी लाटेतही मनसेला याठिकाणी २७ हजारांहून अधिक मतदान झालं होतं. येथे भाजपाचे उमेदवार ४५ हजार मते घेऊन विजयी झाले होते. 

विदर्भात मनसेला ०-२ जागा मिळू शकतात असं पोल डायरीच्या सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. विदर्भात भाजपाला ४०-४८ जागा, शिवसेना- ४-८ जागा, काँग्रेस- ९-१३, राष्ट्रवादी १-५ जागा, इतरांना ४-७ जागा वर्तविण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने २०१४ मध्ये १९ जागा जिंकल्या होत्या यावेळी २३-३१ जागा जिंकू शकते. शिवसेना ५-११ जागा, काँग्रेस ७-१४ जागा, राष्ट्रवादी १५-२१ तर इतरांना २-७ जागा मिळण्याची शक्यता दाखविली आहे. 

उत्तर महाराष्ट्रात भाजपाला १८-२२ शिवसेना ९-१५ जागा, काँग्रेस ८-१२ जागा, राष्ट्रवादी ८-१३ जागा तर इतरांना २ जागा दाखविण्यात आली आहे. मराठवाड्यात भाजपाला १४-१८, शिवसेना १९-१३, काँग्रेस ९-१४, राष्ट्रवादी ६-११ इतर ०-४ जागा जिंकण्याची शक्यता आहे. कोकण विभागात भाजपाला २६-२९ जागा, शिवसेना २८-३२ जागा, काँग्रेस ६-१०, राष्ट्रवादी ५-११ तर इतरांना ५-१० जागा देण्यात आलेल्या आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेसमनसेभाजपाशिवसेनामतदानोत्जतर जनमत चाचणी