Join us  

Maharashtra Election 2019: ...पण वार मी समोरुनच करणार; राणे पुत्रांमधील मतभेद चव्हाट्यावर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 9:56 AM

नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पुत्रांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे या नितेश राणे यांच्या वक्तव्याशी मी अजिबात सहमत नाही अशी स्पष्ट भूमिका निलेश राणे यांनी मांडली आहे. त्यामुळे या दोन भावांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. 

शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला आहे. 

यावर माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार अशा शब्दात निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली आहे. 

बीबीसी मराठी या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेबाबतचे आपले मत स्पष्टपणे मांडलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले की, ''आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घेतलेली भूमिका सकारात्मक आहे. ते विधिमंडळाचे कामका समजून घेण्यासाठी, कायदेनिर्मिती कशी होते हे समजून घेण्यासाठी निवडणूक लढवत असतील, तर त्याचे स्वागतच करायला हवे.''  

तर दुसरीकडे नारायण राणे यांनीही सिंधुदुर्गात भाजपाच्या तिन्ही जागा निवडून येतील असं सांगत शिवसेनेबद्दल बोलताना सांगितले होते की, राणे आणि शिवसेना यांच्यातील कटुता एकाबाजूने संपणार नाही तर त्यासाठी दोन्ही बाजूंनी तशी भूमिका घ्यायला हवी असं सांगत सावध भूमिका घेतली आहे.  

टॅग्स :नारायण राणेनीतेश राणे निलेश राणे शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरे