Maharashtra Election 2019: Former Congress councilor Shiva Shetty enters BJP with workers | Maharashtra Election 2019: काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
Maharashtra Election 2019: काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

मुंबई: बोरिवली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनील राणे यांना आता निवडणूक आणखी सोपी होणार आहे कारण काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी भाजप प्रवेश केला आहे. कांदिवली पूर्व येथे उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थिती आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवा शेट्टी यांच्या पाठीशी असलेली कार्यकर्त्यांची ताकदही आता असूनही राणे यांच्या पाठीशी असणार आहे. मात्र यामुळे काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील ताकदीला घरघर लागली असल्याची चर्चा आहे.

शिवा शेट्टी काँग्रेसचे माजी नगरसेवक असून बोरिवली मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र काँग्रेसकडून कुमार खिल्लारे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज शिवा शेट्टी यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बंडखोरी थंडावली असे वाटत होते. मात्र गुरुवारी भाजप पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. यामुळे बोरिवली मतदारसंघात आता भाजपचं सुनील राणे यांचयसमोर कोणताही तगडा उमेदवार नसल्याने त्यांचा मार्ग आणखी सुकर झाला असल्याचे चित्र आहे.

मागील निवडणुकीत भाजपाचे विनोद तावडे यांना १ लाखाहून अधिक मते मिळाली होती आणि सेनेच्या उमेदवाराला ८० हजार मतांनी त्यांनी पराभूत केले होते. यावेळी सेना भाजप युतीचा फायदा विनोद तावडे यांना नक्कीच झाला असता मात्र आता त्यांच्याऐवजी उमेदवारी मिळालेल्या सुनील राणे यांना युतीचा किती फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Former Congress councilor Shiva Shetty enters BJP with workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.